पुणेकरांनो,  हॉटेल, लॉज उद्यापासून सुरू

hotel
hotel

पुणे - लॉकडाउनमुळे तीन महिन्यांहून अधिक काळ बंद असलेली प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील हॉटेल, लॉज आणि गेस्ट हाउस येत्या बुधवार (ता. ८) पासून ३३ टक्के क्षमतेत सुरू होणार आहेत. यासाठी राज्य सरकारने परवानगी दिली असून, आज याबाबतचा अध्यादेश जारी केला. 

हा आदेश केवळ वेगळ्या खोल्यांची व्यवस्था असलेले हॉटेल, लॉज आणि गेस्ट हाउसपुरता मर्यादित आहे. तसेच ते प्रतिबंधित क्षेत्रात नसावे, असेही आदेशात म्हटले आहे. शहरात अशी पन्नास हॉटेल असून, यामुळे पुणेकरांना त्यात जेवणाची चव चाखता येईल. मात्र केवळ जेवणाची सुविधा पुरवणाऱ्या हॉटेल व्यावसायिकांना आणि तेथील पदार्थांची चव चाखण्यास इच्छुक असलेल्यांना आणखी काही दिवसांची वाट पाहावी लागणार आहे. 

लॉकडाउनमुळे राज्यभरातील उद्योगधंदे बंद करण्यात आले होते. मात्र ‘मिशन बिगीन अगेन’च्या दोन टप्प्यांमध्ये अनेक व्यवसाय सुरू झाले होते; पण हॉटेल व्यवसाय बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे हॉटेल सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली होती. या पार्श्वभूमीवर रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व हॉटेल व्यावसायिकांच्या संघटनेचे प्रतिनिधी यांच्यात बैठक झाली. सरकारने तत्परता दाखवीत दुसऱ्याच दिवशी या बाबतचा आदेश काढला.

हॉटेलमध्ये जाणाऱ्यांसाठी...  
- संबंधिताने ‘आरोग्य सेतू’ ॲप डाऊनलोड करावे
- हाउसकीपिंगचा कमीत कमी वापर करावा
- कोरोनाची लक्षणे नसलेल्यांनाच प्रवेश
- प्रवास आणि इतर आवश्‍यक माहिती रिसेप्शनवर पुरवावी

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हॉटेल चालकांसाठी...  
- रूम खाली झाल्यानंतर २४ तास ती कोणालाही देऊ नये
- लिफ्ट, पाण्याचे ठिकाण आणि स्वच्छतागृहे सतत साफ करावे
- मास्क, ग्लोज आणि इतर वस्तूंची सुरक्षित विल्हेवाट लावावी

क्वारंटाइन सेंटरसाठी...
एखादे हॉटेल किंवा गेस्ट हाउस क्वारंटाइन सेंटर केले असेल तर ती सुरू ठेवण्याचा निर्णय स्थानिक प्रशासन घेऊ शकणार आहे. तसेच ३३ टक्के क्षमता ग्राहकांसाठी वापरल्यानंतर उरलेली ६७ टक्के क्षमता ही क्वारंटाइनसाठी वापरण्याचे अधिकार हे स्थानिक प्रशासनाला देण्यात आलेले आहेत.

लॉज, रूम असलेले हॉटेल आणि गेस्ट हाउस सुरू करण्यास परवानगी दिल्याचा निर्णय चांगला आहे. मात्र इतर हॉटेलही  सुरू करण्यास परवानगी द्यावी. तीन महिन्यांहून अधिक काळ हे हॉटेल बंद आहेत. त्यावर सुमारे अडीच लाख लोकांचा रोजगार अवलंबून आहे. याचा विचार करून इतर हॉटेल सुरू करण्यासही लवकर परवानगी द्यावी.
-गणेश शेट्टी, अध्यक्ष, पुणे रेस्टॉरंट अँड हॉटेलियर्स असोसिएशन

आदेशात काय? 
    रूम असलेले हॉटेल, लॉज आणि गेस्ट हाउस ३३ टक्के क्षमतेत सुरू होतील
    हॉटेल, लॉज, गेस्ट हाउस प्रतिबंधित क्षेत्रा बाहेर असावे
    सुरक्षाविषयक खबरदारी हवी
    मास्क, ग्लोज कर्मचारी व ग्राहकांना पुरवाव्यात
    डिजिटल पेमेंटचे पर्याय उपलब्ध करावेत
    नियम पाळूनच ‘एसी’ सुरू करावेत
    स्वीमिंग पूल, गेम झोन, चिल्ड्रन प्ले, जिम अशा सुविधा बंद ठेवाव्यात 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com