
ग्राहकांना जेवणापूर्वी फुकट सूप देणाऱ्या एका हॉटेलचालकाच्या डोक्यात हत्याराने केले वार.
Pune Crime : फुकट सूप देणे महागात पडले, हॉटेलचालकावर हत्याराने वार
पुणे - ग्राहकांना जेवणापूर्वी फुकट सूप देणाऱ्या एका हॉटेलचालकाच्या डोक्यात हत्याराने वार केले. ही घटना खडकी परिसरात सहा फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता घडली. व्यावसायिक स्पर्धेतून हा हल्ला करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मुलायम रामकृपाल पाल (वय २७, रा. दुर्गा माता मंदिराजवळ, मिलिटरी डेअरी फार्म, खडकी) असे जखमी झालेल्या हॉटेलचालकाचे नाव आहे. याबाबत पाल यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून सिद्धार्थ भालेराव आणि दिग्विजय गजरे (दोघे रा. खडकी) यांच्याविरुध्द खडकी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाल यांचे खडकी बाजार परिसरात चौपाटीजवळ ‘ओ शेठ’ नावाचे हॉटेल आहे. त्यांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी फुकट सूप देण्याची योजना सुरू केली. आरोपी भालेराव आणि गजरे यांची खडकी चौपाटीजवळच खाद्यपदार्थ विक्रीची गाडी आहे. पाल यांच्याकडे ग्राहकांचा प्रतिसाद वाढल्यामुळे दोघे आरोपी पाल यांच्यावर चिडून होते. या वादातून आरोपींनी पाल यांला मारहाण करून डोक्यात लोखंडी हत्याराने वार केले. त्यात हॉटेलचालक पाल हा गंभीर जखमी झाला आहे.