पुण्यात झिंगाट पार्ट्या जोरात

Hotel-Party
Hotel-Party

पुणे - पुण्यात कॉर्पोरेट कल्चर झपाट्याने वाढत असताना कंपन्यांकडून कधी ग्रॅंड सक्‍सेस पार्टी, तर कधी ॲन्यूवल पार्टीच्या निमित्ताने मेजवानी दिली जाते. आनंदाचा क्षण द्विगुणित करण्यासाठी मित्र, मैत्रिणींसह आप्तस्वकीयांना पंचतारांकीत हॉटेलमध्ये पार्टी देण्याकडे कल वाढला आहे. पुण्यात १४ महिन्यांत २ हजार ९०१ झिंगाट पार्ट्या झाल्या असून, पार्ट्यांसाठी दिल्या जाणाऱ्या मद्य परवान्यापोटी राज्य सरकारला कोट्यवधीचा महसूल मिळाला आहे. 

देशाच्या कानाकोपऱ्यातून तरुण-तरुणी नोकरीसाठी पुण्यात येऊन स्थायिक होत आहेत. अशा या ‘कॉस्मोपॉलिट’ पुण्यात आता कॉर्पोरेट कल्चर चांगलेच रुजले आहे. सोमवार ते शुक्रवार कामाच्या ओझ्याखाली दबून गेलेले कंपन्यांमधील उच्च शिक्षित कर्मचारी शनिवार, रविवार विकएंडला मित्र-मैत्रिणींसोबत पार्टी करून फुल्ल धमाल करतातच; पण अनेक कंपन्यांकडून त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी तीन महिन्यांनी, सहा महिन्यांनी किंवा वर्षातून एकदा पार्टी दिली जाते. त्याचप्रमाणे लग्न, वाढदिवस, व्यवसायात मिळालेले यश यांसह अन्य कारणांनीही मोठ्या पार्ट्या होत आहेत. 

अशा पार्ट्यांमध्ये जेवणासह मद्यही उपलब्ध करून दिले जाते. पार्टीमध्ये मद्य पुरविण्यासाठी आयोजनकांना ज्या ठिकाणी पार्टी करणार आहोत, त्याचा तपशील देऊन एका दिवसाचा परवाना दिला जातो. त्यासाठी १० हजारांचे शुल्क आहे. या शुल्कापोटी सरकारला २०१८-१९ मध्ये २ कोटी ५५ लाख १० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. तर एप्रिल आणि मे या दोन महिन्यांत ३५ लाखांची तिजोरीत भर पडली आहे. १ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०१९ या काळात २ हजार ५५१, तर एप्रिल आणि मे महिन्यात ३५० परवाने दिले आहेत, असे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपअधीक्षक सुनील फुलपगर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com