वाल्हेकरवाडीतील गृहप्रकल्प संथगतीने

दीपेश सुराणा
गुरुवार, 28 जून 2018

पिंपरी - वाल्हेकरवाडीतील स्पाइन रस्त्यालगत नवनगर विकास प्राधिकरणातर्फे उभारण्यात येत असलेल्या ७९२ घरांच्या गृहयोजनेसाठी कामाचे आदेश देऊन अडीच वर्षांचा कालावधी उलटला आहे. मात्र, अद्यापही या प्रकल्पाच्या कामाने अपेक्षित वेग पकडलेला नाही. प्रकल्पाला विलंब होत असल्याने प्राधिकरणातर्फे कंत्राटदाराला सध्या दररोज दहा हजार रुपये दंड लागू आहे. दंडापोटी कंत्राटदाराकडून प्राधिकरणाने मे अखेरपर्यंत ४५ लाख रुपये वसूल केले आहेत. 

वाल्हेकरवाडी गृहयोजनेतील घरांची किंमत किती असेल, याबाबत अद्याप अनिश्‍चितता आहे. मात्र, येथे स्वस्तात घरे उपलब्ध होतील, अशी सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा आहे. त्यामुळे ही गृहयोजना कधी पूर्ण होईल, याकडे नागरिकांचे लक्ष लागलेले आहे. संबंधित गृहयोजनेच्या कामासाठी सात जानेवारी २०१६ रोजी आदेश देण्यात आले. मात्र, राजकीय विरोधामुळे प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम ६ ते ८ महिने उशिराने सुरू झाले.

प्रकल्पासाठी ७३ कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासाठी सहा जुलै २०१९ पर्यंत मुदत आहे. प्रकल्पात तीन मजल्याच्या ५५ इमारती उभारल्या जाणार आहेत. त्यातील ३० इमारतींचे पार्किंग स्लॅबपर्यंत, २० इमारतींचे पायापर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. दोन इमारतींचे तीन मजल्यापर्यंत काम झाले आहे. तर, दोन इमारतींचे कामच सुरू झालेले नाही. कामाला विलंब होत असल्याने प्राधिकरणाने कंत्राटदाराला २५ ऑक्‍टोंबर २०१६ पासून २ हजार रुपये तर, ६ मार्च २०१७ पासून ५ हजार दंड लागू केला. दंडात वाढ करीत ६ नोव्हेंबर २०१७ पासून सध्या प्रतिदिन १० हजार रुपये दंड लागू आहे. 

दृष्टिक्षेपात गृहयोजना
एकूण क्षेत्र - ३४ हजार चौरस मीटर
बांधकाम क्षेत्र - २७ हजार चौरस मीटर 
नियोजित इमारती - ५५ 
एकूण सदनिका - ७९२
वन रूम किचन सदनिका (२७४ चौरस फूट) - ३७८
वन बीएचके सदनिका (३७२ चौरस फूट) - ४१४

‘‘ॲल्युफोम तंत्रज्ञानाचा वापर करून सध्या वाल्हेकरवाडी गृहयोजनेत बांधकाम सुरू आहे. त्यामुळे स्लॅब व भिंतीचे काम एकावेळी होत आहे. प्रकल्पातील प्रत्येक इमारतीत जमिनीखाली सहा हजार लिटरची टाकी, छतावर पाण्याची टाकी, सोलर वॉटर हिटर, ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांना चढ उताराचा त्रास होऊ नये, यासाठी जोत्यावरील (ग्राउंड लेव्हल) सदनिका दिल्या जाणार आहेत.’’ 
- प्रभाकर वसईकर, कार्यकारी अभियंता, नवनगर विकास प्राधिकरण.

Web Title: house project slow in walekarwadi