चांदरमधील घरे प्रकाशाने उजळली 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 मे 2018

पुणे - सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत वसलेल्या वेल्हे तालुक्‍यातील अतिदुर्गम चांदर गावालगतच्या दोन वस्त्यांसाठी अवघ्या सात दिवसांत 65 वीजखांब व एका वितरण रोहित्राची वीजयंत्रणा महावितरणकडून बसविण्यात आली अन्‌ आजवर चांदण्यांच्या टिपूर प्रकाशात राहण्याची सवय असणाऱ्या चांदर गावासह डिगे वस्ती व टाके वस्तीमधील घरेही महावितरणच्या प्रकाशाने उजळून निघाली. 

पुणे व रायगड जिल्ह्याच्या सीमेलगत सह्याद्रीच्या घनदाट वनराईच्या डोंगरदऱ्यातील अतिदुर्गम भागात वसलेले चांदर गाव. दोन डोंगराच्या खोल दरीत वसलेले हे 18 घरांचे गाव. बाजूलाच असलेल्या डोंगरमाथ्यावर 10 घरांची टाके वस्ती व दुसऱ्या डोंगरमाथ्यावर 18 घरांची डिगे वस्ती असा 46 घरांचा परिसर. पुण्यापासून सुमारे 90 किलोमीटर अंतरावर असलेले व सुमारे साडेचार ते पाच तासांच्या प्रवास केल्यानंतर पानशेत धरणाच्या पाणलोट क्षेत्राचे शेवटचे टोक म्हणजे हे गाव. चांदर व लगतच्या दोन्ही वस्त्यांचा पावसाळ्यात तर जगाशी संपर्क तुटलेला असतो. 

अशा या दुगम भागात रोहित्राच्या वीजखांबावर रात्री लखलखणाऱ्या दिव्याने चांदर गावासह दोन्ही वस्त्यांना महावितरणने खेचून आणलेला प्रकाश आता घराच्या उंबरापर्यंत येत असल्याची चाहूल दिली. या वेळी ग्रामस्थांनी साखर वाटून आनंद व्यक्त केला. 

वीस लाख रुपये खर्च 
महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांना प्रसिद्धिमाध्यमांद्वारे चांदर गावाची माहिती मिळाली. या गावाला वीजपुरवठा करण्यासाठी ताबडतोब कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले. त्यानुसार महावितरणचे प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक अधिकाऱ्यांनी चांदर गावाची प्रत्यक्षात पाहणी केली. त्यानंतर 20 एप्रिलला प्रत्यक्षात काम सुरू झाले. सुमारे 60 कर्मचारी चांदर परिसरातील डोंगरदऱ्यात वीजयंत्रणा उभारण्याच्या कामी लागले. सकाळी नऊ ते रात्री उशिरापर्यंत हे सर्वजण राबत होते. सलग सात दिवसांच्या अविश्रांत कामानंतर 26 एप्रिलला वितरण रोहित्र व उच्चदाब वाहिनी कार्यान्वित झाली. ही वीजयंत्रणा उभारण्यासाठी महावितरणला सुमारे 20 लाख रुपये खर्च आला.

Web Title: houses of the Chandra lighted by MSEB