पीएमआरडीएची परवडणारी घरे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 सप्टेंबर 2019

अत्यल्प उत्पन्न गटातील नागरिकांना परवडणारी घरे देण्यासाठी पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) मुळशी तालुक्‍यातील नेरे येथील साडेचार हेक्‍टर जागेची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

पुणे - अत्यल्प उत्पन्न गटातील नागरिकांना परवडणारी घरे देण्यासाठी पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) मुळशी तालुक्‍यातील नेरे येथील साडेचार हेक्‍टर जागेची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. तेथे नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ३० चौरस मीटरच्या सुमारे एक हजार १५२ घरांची निर्मिती करण्यात येणार आहे. या घरांची किमत ९ लाख ६० हजार रुपये प्रस्तावित करण्यात येणार आहे.

केंद्र सरकारने पीएमआरडीएच्या हद्दीतील ८४२ गावांचा समावेश पंतप्रधान आवास योजनेत समावेश केला आहे. त्यामुळे या योजनेंतर्गत सरकारच्या जागेवर खासगी भागीदारी तत्त्वावर परवडणाऱ्या घरांची निर्मिती करण्याची जबाबदारी प्राधिकरणावर आली आहे. त्यापैकी वैयक्तिक घरकुल योजनेसाठी अडीच लाख रुपयांचे अनुदान मिळण्यासाठी ९ तालुक्‍यांतून आतापर्यंत ४१ हजार ४६६ अर्ज प्राप्त झाले आहेत. तर, खासगी भागीदारी तत्त्वावर परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीसाठी २३ प्रस्ताव दाखल झाले आहेत. त्यापैकी ७ प्रस्तावांना केंद्र व राज्य सरकारने मान्यता दिली. त्यातून ३० हजार १९१ घरांची निर्मिती होणार आहे.

नेरेतील प्रकल्प
  साडेचार हेक्‍टर जागा
  ३० चौरस मीटरची घरे
  घरांची संख्या १,१५२
  लाइट गेज स्टील फ्रेम स्ट्रक्‍चरचे तंत्रज्ञान

पंतप्रधान आवास योजनेत
  पीएमआरडीएतील गावे : ८४२
  अर्ज : ९ तालुक्‍यांतून ४१ हजार ४६६
  खासगी प्रस्ताव : २३
  प्रस्ताव मंजूर : ७
  घरांची निर्मिती : ३० हजार १९१


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Houses of PMRDA