सुटीसाठी गावाकडे परतायचे कसे?

सुटीसाठी गावाकडे परतायचे कसे?

पुणे - गावाकडं दुष्काळामुळं शेती ओस पडलीय...दोन वेळचं जेवण मिळावं, म्हणून घरच्यांना वणवण करावी लागतीय, पिण्यासाठीही पाणीही शिल्लक नाही, या परिस्थितीत सुटीच्या दिवसांत गावाकडं कसं परतायचं, अशी व्यथा दुष्काळग्रस्त भागातून शिक्षणासाठी शहरात आलेले विद्यार्थी व्यक्त करीत आहेत.

सुटीत गावाकडे जाण्याची ओढ असली, तरीही गावातील बिकट परिस्थितीमुळे परतणे अवघड झालंय, म्हणून या विद्यार्थ्यांनी सुटीच्या दिवसांत ‘पार्ट टाइम’ नोकरीचा पर्याय निवडला आहे. सर परशुरामभाऊ महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षण घेणारा निवृत्ती निगोटे मूळचा नांदेड जिल्ह्यातील रिसणगावचा. दुष्काळामुळे गावची परिस्थिती बिकट आहे. उन्हाळ्याच्या सुटीत गावाकडे जाण्यापेक्षा पुण्यात ‘पार्ट टाइम’ नोकरीचा पर्याय त्याने निवडला. ‘‘दोन महिने नोकरी केली तर, किमान शैक्षणिक शुल्क, शैक्षणिक साहित्य, खोली भाडे आणि खानावळीचा वर्षभराचा खर्च भागणार आहे. त्यासाठी सध्या केटरिंगच्या व्यवसायात काम करत आहे,’’ असे त्याने सांगितले. गावात पिण्यासाठी पाणी नाही, पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागते, अशा परिस्थितीत गावाकडे कसे जायचे, असा प्रश्‍न विद्यासागर निरस याने उपस्थित केला. विद्यासागर हा परभणीतील पडेगावचा आहे. तो म्हणाला, ‘‘गावाकडे आई-वडील शेती करतात. यंदा पाणी नसल्याने शेती ओस पडली आहे. पुण्यात राहूनच काहीतरी काम करून पुढील वर्षाचा शैक्षणिक खर्च भागवायचा आहे. गावाकडे काही मदत देता आली, तर त्यासाठी प्रयत्न करायचा आहे. म्हणून सध्या रात्रीच्यावेळी सुरक्षारक्षक म्हणून काम करत आहे.’’ विद्यासागर हा अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेत आहे.

नांदेडमधील हिरनाळा गावातील विनायक रेणेवाड यानेदेखील सुटीत गावाला न जाण्याचाच मार्ग निवडला आहे. तो म्हणाला, ‘‘गावाकडे दोन एकर कोरडवाहू शेती आहे. वडील शेती सांभाळतात आणि भाऊ शेतमजुरी करतो. सध्या गावाकडे कौटुंबिक खर्च भागवणेही अवघड आहे. त्यामुळे विश्रामबागवाड्याजवळील एका कपड्याच्या स्टॉलवर काम  करीत आहे.’’


गावाकडे जाण्याची कितीही इच्छा असली, तरीही दुष्काळामुळे गावाकडची परिस्थिती बिकट आहे. अशा परिस्थितीत घरच्यांवरील खर्चाचे ओझे वाढविण्यापेक्षा शहरात राहून मिळेल ते काम करणे महत्त्वाचे वाटते.
- विनायक रेणेवाड, विद्यार्थी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com