किती काळा पैसा बाहेर आला ते जाहीर करा - सुप्रिया सुळे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जानेवारी 2017

सासवड - नोटाबंदीने काळा पैसा कोणाचा व किती बाहेर काढला हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर करावे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.

सासवड - नोटाबंदीने काळा पैसा कोणाचा व किती बाहेर काढला हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर करावे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.

नोटाबंदीच्या निषेधार्थ सासवड (ता. पुरंदर) येथे सोमवारी (ता. 9) राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे नगरपालिका चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्या वेळी त्या बोलत होत्या. या वेळी कार्यकर्त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात निषेधाच्या घोषणा दिल्या. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, वैशाली नागवडे, अशोक टेकवडे, विजय कोलते, प्रा. दिगंबर दुर्गाडे, सारिका इंगळे, सुदाम इंगळे, अंजना भोर, माणिक झेंडे, सुजाता दगडे, ऍड. कला फडतरे, शिवाजी पोमण, संतोष जगताप आदी या वेळी उपस्थित होते.

नोटाबंदीच्या निर्णयाने जिल्हा बॅंकेची व त्यामुळे शेतकरी, ग्रामीण जनतेची अडवणूक सरकारने केली आहे. न्यायालयात जाऊनही जिल्हा बॅंकांवरील निर्बंध उठत नाहीत. केंद्र सरकार जाणीवपूर्वक अडवणूक करत आहे. शेतमालाचे भाव पडले आहेत. त्यामुळे मोदी व फडणवीस सरकारला धडा शिकविण्याची वेळ आली आहे, असे सांगून सुळे यांनी आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखवा, असे आवाहन केले.

दरम्यान, हुंडेकरी चौकातील एटीएम केंद्र बंद असल्याने आंदोलकांनी तीव्र संताप व्यक्त केला.

सुळे यांनी कार्यकर्त्यांसह शहराच्या काही भागांतून पायी फेरी मारली. त्यांनी व्यावसायिक व ग्राहकांशीही संवाद साधला.

...गुन्हा कोणावर दाखल करायचा?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षात होते, त्या वेळी शेतकरी आत्महत्येबाबत सरकारवर 302 म्हणजेच खुनाचा गुन्हा दाखल करण्याबाबत आग्रही होते. आता ते मुख्यमंत्री असताना झालेल्या शेतकरी आत्महत्यांबद्दल कोणावर गुन्हा दाखल करायचा? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला.

Web Title: How to make the announcement came out black money