'नव्या कार्यकर्त्यांना डावलून कॉंग्रेस कसा विस्तारणार?'

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 मार्च 2017

पुणे - 'महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे आव्हान असतानाही नव्या कार्यकर्त्यांनी त्या-त्या प्रभागांमध्ये चांगली मते घेतली. मात्र, पक्षांतर्गत राजकारणामुळे त्यांना पदे दिली जात नाहीत. मग, पक्षाचा विस्तार कसा होणार,'' असा प्रश्‍न कॉंग्रेसच्या "ब्लॉक' अध्यक्षांनी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना विचारला. स्थानिक नेत्यांमधील हेवेदाव्यांमुळेच निवडणुकीत पराभव झाल्याचे गाऱ्हाणेही त्यांनी मांडले.

पक्षाच्या कोथरूड ब्लॉकचे अध्यक्ष विजय खळदकर यांच्या नेतृत्वाखाली शिवराज भोकरे, सतीश पवार, सुनील घाडगे, सतीश शिंदे, राजेंद्र भुतडा यांनी चव्हाण यांची मुंबईत भेट घेतली. महापालिका निवडणुकीत कॉंग्रेसची पीछेहाट झाल्याने पक्षातील गटातटाच्या राजकारणाने डोके वर काढले आहे. त्यातच, पराभवाला पक्षाचे आजी-माजी आमदार जबाबदार असल्याची तक्रारी ब्लॉक अध्यक्षांनी चव्हाण यांच्याकडे केली आहे.

खळदकर म्हणाले, 'भाजपचे आव्हान असतानाही कॉंग्रेसकडून प्रचाराचे नेटके नियोजन केले नव्हते. पक्षाने अनेकांना आमदार केले मात्र, प्रचारासाठी ते फिरकलेच नाहीत. त्यामुळे उमेदवारांना नेत्याविनाच प्रचार करावा लागला. वर्षानुवर्षे ज्या प्रभागांमध्ये पक्षाची मते वाढत नव्हती. अशा प्रभागांमध्येही मते वाढली आहेत. मात्र, स्थानिक नेतृत्व त्याची दखल घेत नाही. याबाबत चव्हाण यांच्याकडे भावना मांडल्या आहेत.'' दरम्यान, महापालिकेतील स्वीकृत सदस्यपदासाठी नव्या कार्यकर्त्यांचा विचार करण्याची मागणी केल्याचेही खळदकर यांनी सांगितले.

Web Title: How the new Congress activists after rejection coverage?