बदलत्या काळात खेडी वाचवायची कशी ?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 ऑक्टोबर 2016

डॉ. सदानंद मोरे यांचा सवाल : "सकाळ'च्या शब्ददीप दिवाळी अंकाचे प्रकाशन

डॉ. सदानंद मोरे यांचा सवाल : "सकाळ'च्या शब्ददीप दिवाळी अंकाचे प्रकाशन

पुणे - ""शहरी जीवनशैलीचे खेड्यांवर जोरात आक्रमण होत आहे. त्यामुळे गाव आणि शहर यात मोठा फरक दिसत नाही. अशा आजच्या बदलत्या काळात आपली खेडी वाचवायची कशी, हा खरा प्रश्‍न आहे,'' असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांनी गुरुवारी येथे व्यक्त केले.
"सकाळ'च्या "शब्ददीप' आणि पुणे आवृत्तीच्या "दिवाळी विशेषांक' या दिवाळी अंकाचे प्रकाशन डॉ. मोरे यांच्या हस्ते एका अनौपचारिक सोहळ्यात झाले. या वेळी "सकाळ'चे मुख्य संपादक श्रीराम पवार, संचालक (तंत्रज्ञान) भाऊसाहेब पाटील, संपादक मल्हार अरणकल्ले, कार्यकारी संपादक नंदकुमार सुतार, वरिष्ठ उपसंपादक प्रदीप कुलकर्णी उपस्थित होते.

त्रिंबक नारायण आत्रे यांच्या "गावगाडा' या पुस्तकाला पूर्ण झालेली शंभर वर्षे आणि जागतिकीकरणामुळे झालेले बदल या पार्श्‍वभूमीवर संवाद साधत डॉ. मोरे यांनी वेगळी निरीक्षणे नोंदवली. ते म्हणाले, ""महात्मा गांधींनी "खेड्याकडे चला', असे सांगितले होते, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी "शहराकडे चला', अशी घोषणा दिली होती. या दोन्ही विधानांवर आजही चर्चा होते. ती परस्परविरोधीही मानली जाते; पण आज जागतिकीकरणामुळे खेडी बदलत आहे. ब्युटी पार्लरपासून अनेक गोष्टी खेड्यात सुरू झाल्या आहेत. अशा बदलांचाही गांभीर्याने विचार व्हायला हवा.''

श्रीराम पवार म्हणाले, ""सकाळ'तर्फे यंदा 14 दिवाळी अंक प्रकाशित होत आहेत. समाजातील वेगवेगळ्या घटनांवर, विषयांवर विचारमंथन व्हावे, त्या-त्या प्रश्‍नांवर चर्चा घडवून आणावी, हा उद्देश समोर ठेवून हे दिवाळी अंक आम्ही वाचकांच्या हाती देत आहोत.'' वरिष्ठ उपसंपादक मंदार कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. मल्हार अरणकल्ले यांनी आभार मानले.

हा उपक्रम महत्त्वाचाच
"दिवाळीत वेगवेगळ्या प्रकारचा फराळ असतो. त्यात तिखट, गोड पदार्थांचा समावेश असतो. फटाकेसुद्धा निरनिराळे असतात. अगदी टिकल्यांपासून फुलबाजाही असतात. तसे दिवाळी अंकही निरनिराळ्या प्रकारचे प्रकाशित करायचे, तेही सर्व वयोगटांतील वाचकांचा विचार करून... हा "सकाळ'चा उपक्रम निश्‍चितच महत्त्वाचा आहे,'' असे डॉ. मोरे यांनी सांगितले.

Web Title: How to save villages in changing era?