बदलत्या तंत्रज्ञानात "एचआर'ने "अपडेट' राहावे - अनिल धानकर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 जानेवारी 2017

पुणे - 'मनुष्यबळ विकास (एचआर) क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी औद्योगिक क्षेत्रातील बदलते तंत्रज्ञान व त्याचा योग्य वापर, तसेच आपल्या संस्थेतील कर्मचाऱ्यांच्या गरजा, जगभरातील घडामोडी याबद्दल स्वतः ला "अपडेट' ठेवणे आवश्‍यक आहे,'' असा गुरुमंत्र अबुधाबी कमर्शिअल बॅंकेचे मनुष्यबळ विकास विभागप्रमुख कॅप्टन अनिल धानकर यांनी दिला.

पुणे - 'मनुष्यबळ विकास (एचआर) क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी औद्योगिक क्षेत्रातील बदलते तंत्रज्ञान व त्याचा योग्य वापर, तसेच आपल्या संस्थेतील कर्मचाऱ्यांच्या गरजा, जगभरातील घडामोडी याबद्दल स्वतः ला "अपडेट' ठेवणे आवश्‍यक आहे,'' असा गुरुमंत्र अबुधाबी कमर्शिअल बॅंकेचे मनुष्यबळ विकास विभागप्रमुख कॅप्टन अनिल धानकर यांनी दिला.

सकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटरच्या (एसआयएलसी) "एचआर पॉवर फोरम'तर्फे आयोजित "कौशल्य व्यवस्थापन-समस्या आणि व्यवस्थापन' या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते. फिनोलेक्‍स के. बी. कंपनीचे मनुष्यबळ विकासप्रमुख जितेंद्र मोरे, सिंटेल टेलिकॉमचे मनुष्यबळ विकासप्रमुख सुधीर मते, "एसआयएलसी'च्या मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. अपूर्वा पालकर, सकाळ माध्यम समूहाचे उत्पादनप्रमुख योगेश शर्मा हे उपस्थित होते. या वेळी इंटरकॉम सोल्यूशन प्रायव्हेट लिमिटेडचे बिझनेस डेव्हलपमेंट संचालक डॉ. वासू रामानुजन यांनी मनुष्यबळ विकास क्षेत्राचा आतापर्यंतचा प्रवास, त्यातील बदलते प्रवाह, या क्षेत्राकडून भविष्यातील अपेक्षा आणि संभाव्य स्वरूप याविषयी मार्गदर्शन केले.

कॅप्टन धानकर म्हणाले, 'अर्थविश्‍व हे वेगवान आहे. यात सतत नवीन बदल घडत असतात. त्यामुळे या क्षेत्रात अनेक नवीन आव्हाने उद्‌भवतात. त्यातील प्रमुख म्हणजे वेगाने बदलते तंत्रज्ञान. या तंत्रज्ञानाबद्दल केवळ माहिती असून चालत नाही, तर त्यांचा योग्यप्रकारे वापर करून तुम्ही तुमच्या कौशल्यांचा विकास केला पाहिजे. त्याचबरोबर जागतिक स्तरावर अर्थविश्‍वातील बदलत्या घडामोडी, त्यांचे आपल्यावर होणारे परिणाम आणि त्यासंबंधी तुमचा कृती कार्यक्रम तयार असणे आवश्‍यक असते. यातूनच तुम्ही एक यशस्वी मनुष्यबळ विकास अधिकारी बनू शकता.''

मोरे म्हणाले, 'मनुष्यबळ क्षेत्रात काम करत असताना कामगार कायद्यांबद्दलही जाणून घेणे आवश्‍यक असते. कामगार कायद्यांबद्दलच्या ज्ञानाद्वारे तुम्ही संस्थेच्या कामगारांशी योग्यप्रकारे व्यवहार करू शकता. कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी, त्यांच्यातील कौशल्य विकसित करण्यासाठी प्रत्येक संस्थेने स्वतःचे कौशल्य विकसन केंद्र उभारले पाहिजे.''

मनुष्यबळ विकास क्षेत्रासाठी काही आवश्‍यक कौशल्ये
- कामगारांच्या गरजा समजून घेण्याची क्षमता
- नवीन तंत्रज्ञानाचे ज्ञान आणि त्यांचा प्रभावी वापर
- जागतिक घडामोडींचे ज्ञान
- कामगार कायद्याची माहिती
- कामगारांना संस्थेतील बदल स्वीकारण्यासाठी प्रोत्साहित करण्याची क्षमता

Web Title: hr update in changes technology