एका तपानंतर ‘त्यांनी’ गाठले अपेक्षित यशपूर्ती

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 मे 2019

माहेरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने अर्ध्यावरच शिक्षण सोडावे लागले. मात्र, शिक्षणाच्या अतीव इच्छेमुळे लग्नानंतर तब्बल बारा वर्षांनी बारावीची परीक्षा देऊन त्या उत्तीर्ण झाल्या. त्यांनी चिंतामणी रात्रप्रशालेत प्रथम, तर पुणे जिल्ह्यातील संपूर्ण रात्रप्रशालेतील विद्यार्थ्यांमध्ये दुसरे स्थान पटकावले.

पिंपरी - माहेरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने अर्ध्यावरच शिक्षण सोडावे लागले. मात्र, शिक्षणाच्या अतीव इच्छेमुळे लग्नानंतर तब्बल बारा वर्षांनी बारावीची परीक्षा देऊन त्या उत्तीर्ण झाल्या. त्यांनी चिंतामणी रात्रप्रशालेत प्रथम, तर पुणे जिल्ह्यातील संपूर्ण रात्रप्रशालेतील विद्यार्थ्यांमध्ये दुसरे स्थान पटकावले. 

सलोमी आनंद कावले-तलारे असे त्या विद्यार्थिनी महिलेचे नाव आहे. चिंचवड स्टेशनमधील चिंतामणी रात्रप्रशालेत त्यांनी वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला होता. त्यांना ६५० पैकी ४९५ गुण मिळाले असून, ७६.१५ टक्के प्राप्त केले आहेत. सलोमी यांनी चिटणीस व्यवसाय विषयात १०० पैकी ७९, अर्थशास्त्रमध्ये ८७, वाणिज्य संघटनमध्ये ७०, अकाउंटन्सीमध्ये ६५, मराठीत ८४, इंग्लिशमध्ये ६२ आणि पर्यावरण शास्त्रमध्ये ४८ गुण मिळविले आहेत. त्या रात्रप्रशालेत जिल्ह्यात मुलींमध्ये प्रथम आल्या आहेत. पुढील शैक्षणिक वाटचालीबाबत सलोमी यांना विचारले असता त्यांनी पदवी घेऊन शिक्षिका होण्याचा मानस व्यक्त केला.

सलोमी यांची घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने त्या दौंडमध्ये काका-काकूंकडे राहत होत्या. तेथेच त्यांनी पहिली ते अकरावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. परंतु, शिक्षणाची आवड असली; तरी पैशाची जोड न मिळाल्याने त्यांना शिक्षण अर्ध्यावरच सोडावे लागले. हैदराबादमध्ये कामानिमित्त असलेल्या आई-वडिलांच्या हाती काही काम राहिले नाही. तेही दौंडमध्ये स्थायिक झाले. त्यामुळे आणखीनच बिकट परिस्थिती झाली. दरम्यान, सलोमी यांची चिंचवड स्टेशन-आनंदनगरमधील आनंद बेंजामिन तलारे यांच्याशी २००७ मध्ये लग्नगाठ बांधण्यात आली. त्यांना आता प्रचिती आणि स्तुती या दोन मुली आहेत. त्यांचे पती प्लंबर आहेत. त्या एकत्र कुटुंबात राहतात. पती आनंद यांची मोलाची साथ मिळाल्यामुळे पुन्हा एकदा शिक्षणाची कास धरली. शिक्षण आणि कौटूंबिक जबाबदारीची सांगड घालत त्यांनी चिंचवडमधील चिंतामणी रात्रप्रशालेत प्रवेश घेतला. परंतु, आता १२ वर्षांचे अंतर असल्याने पुन्हा शिक्षण घेणे सोपे नव्हते. पण शिक्षणाची जिद्द कायम असल्याने प्राचार्य सतीश वाघमारे आणि शिक्षकांनी सलोमी यांना मार्गदर्शन केले. बारावीत उत्तीर्ण होईल अशी खात्री नसताना ७६.१५ टक्के प्राप्त झाल्याने माझे स्वप्न सत्यात उतरले, असे त्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: HSC Exam Result Women Salomi Kavale Pass Success