बारावीची परीक्षा आजपासून

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 फेब्रुवारी 2017

यंदा विद्यार्थ्यांच्या संख्येत दहा टक्के वाढ

यंदा विद्यार्थ्यांच्या संख्येत दहा टक्के वाढ
पुणे - करिअरचे अनेक पर्याय खुले करणारी बारावीची परीक्षा उद्यापासून (ता.28) सुरू होत आहे. बारावीच्या परीक्षेसाठी या वर्षी विद्यार्थ्यांची संख्या सुमारे दहा टक्‍क्‍यांनी वाढली. या वर्षी पंधरा लाख पाच हजार 365 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षेबाबत अडचणी असल्यास त्याचे निराकरण करण्यासाठी राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने हेल्पलाइन सुरू केल्या आहेत. राज्यातील दोन हजार 710 केंद्रांवर परीक्षा होईल.

कॅलक्‍युलेटर वापरता येणार
बारावीच्या इंग्रजी विषयाच्या पेपरसाठी प्रचलित पद्धतीने बहुसंची प्रश्‍नपत्रिका असेल. अध्ययन अक्षम आणि ऑटिस्टिक (स्वमग्न) विद्यार्थ्यांना गणित विषयासाठी आणि पुस्तपालन व लेखाकर्म यासह विज्ञान शाखेतील भौतिकशास्त्र आणि रसायनशास्र विषयांच्या परीक्षेसाठी सामान्य कॅलक्‍युलेटर (गणक यंत्र) वापरण्यास परवानगी आहे. मोबाईल आणि वैज्ञानिक पद्धतीचे गणक यंत्र वापरण्यास परवानगी नाही.

सामान्य ज्ञान "ऑनलाइन'
सामान्यज्ञान विषयाची परीक्षा या वर्षी प्रथमच ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. त्यासाठी एक हजार 809 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. याशिवाय माहिती तंत्रज्ञान विषयाची परीक्षा प्रचलित नियमानुसार ऑनलाइन पद्धतीने होईल. त्यासाठी एक लाख 11 हजार 070 विद्यार्थी बसणार आहेत.

प्रात्यक्षिक परीक्षा देता येणार
वैद्यकीयदृष्ट्या किंवा अपरिहार्य कारणास्तव विद्यार्थ्याला प्रात्यक्षिक परीक्षा देता आली नसेल, तर त्याला "आउट ऑफ टर्न' या विहित पद्धतीनुसार परीक्षा देता येईल. ही परीक्षा 27 आणि 29 मार्च रोजी जिल्हानिहाय केंद्रावर आयोजित केली जाणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी विभागीय मंडळांशी संपर्क करावा.

आजारी विद्यार्थ्यांसाठी सुविधा
विद्यार्थ्यांना लेखनिक हवा असेल, संबंधित शाळेने तो उपलब्ध करून द्यायचा आहे. विद्यार्थी खूप आजारी वा रुग्णशय्येवर असेल आणि त्याच्या पालकांनी विनंती केल्यास त्या विद्यार्थ्याला रुग्णवाहिका परीक्षा केंद्रावर आणून तिथे त्याला परीक्षा देण्यास परवानगी दिली जाईल.

विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाइन
विद्यार्थ्यांना परीक्षेबाबत अडचणी वाटल्यास त्यांच्यासाठी हेल्पलाइन सुरू आहे. त्यांचे विभागीय क्रमांक : पुणे (020) 65292317, नाशिक (0253) 2592143. याशिवाय राज्य मंडळाचीदेखील हेल्पलाइन आहे. त्याचे क्रमांक : 020 25705271, 25705272.

प्रवेशपत्र हरवल्यास गोंधळू नका
प्रवेशपत्र (हॉल तिकीट) हरविल्यास किंवा त्यात त्रुटी असल्यास विद्यार्थ्यांनी किंवा त्यांच्या पालकांनी गोंधळून जाऊ नये. विद्यार्थ्यांनी त्यांच्या शाळेत वा केंद्र प्रमुखांशी संपर्क साधल्यास सुधारित प्रवेशपत्र देण्यात येईल.

बारावीसाठी या वर्षीचे विद्यार्थी गेल्या वर्षीचे विद्यार्थी
एकूण 15,05,365 13,88,467
मुले 8,38,929 6,56,436
मुली 6,56436 6,06,286

शाखा नोंदणी केलेले विद्यार्थी
विज्ञान 5,59,423
कला 5,09,124
वाणिज्य 3,73,870
किमान कौशल्य 62,948

गेल्या वर्षी एका जिल्ह्यात सामूहिक कॉपी प्रकरणांमध्ये त्या केंद्रावरील सर्व विद्यार्थ्यांची संपादणूक रद्द करण्यात आली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षेवेळी गैरप्रकार करू नयेत. परीक्षेबाबत कोणतीही अडचण आल्यास हेल्पलाइनवर किंवा शाळेचे मुख्याध्यापक आणि केंद्रप्रमुखांशी संपर्क साधावा.
- गंगाधर म्हमाणे (अध्यक्ष, राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ)

निकाल वेळेवरच; मानधनवाढीचा प्रस्ताव
पुणे : कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी असहकार आंदोलनाचा इशारा दिला असला, तरी त्याचा परिणाम निकालावर होणार नाही. पेपर तपासणीसाठी वेगळी व्यवस्था केलेली नाही, अशी स्पष्टोक्ती बोर्डाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी केली.

म्हमाणे म्हणाले, 'परीक्षेच्या कामाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे. त्यामुळे शिक्षक वर्ग वेळेवर पेपर तपासणी पूर्ण करतील. बारावीचा निकाल वेळेवर लागेल. विद्यार्थी जेईई, नीट, एनआयटीच्या प्रवेश परीक्षांसाठीदेखील प्रयत्न करतात. त्यामुळे कोणत्याही स्थितीत बारावीचा निकाल वेळेत जाहीर केला जाईल. कोणत्याही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही. पर्यवेक्षकापासून ते परीक्षेवेळी पाणी वाटणारांपर्यंत परीक्षेशी संबंधित सर्व घटकांचे मानधन वाढविण्यात येणार आहे. त्यासाठी सरकारकडे प्रस्ताव पाठविला आहे. '''

Web Title: hsc exam start