हुश्‍श... पहिला पेपर सोपा!

शुक्रवार पेठ - इंग्रजीचा पहिला पेपर सोपा गेल्याचे एकमेकींना आनंदात सांगताना जिजामाता शाळेतील विद्यार्थिनी.
शुक्रवार पेठ - इंग्रजीचा पहिला पेपर सोपा गेल्याचे एकमेकींना आनंदात सांगताना जिजामाता शाळेतील विद्यार्थिनी.

पुणे - धाकधूक... धडधड... टेन्शन... परीक्षेचा पहिला दिवस उजाडला, की विद्यार्थ्यांबरोबर पालकांची धास्ती वाढते... आजचा दिवसही तसा होता. बारावीचा आज पहिला पेपर इंग्रजीचा होता. तो झाला आणि मुलांचा जीव भांड्यात पडला. पेपर सोपा गेल्याचे एकमेकांना सांगत विद्यार्थी आनंदाने परीक्षागृहातून बाहेर पडत होते...

सर्व परीक्षा केंद्रांवर अकरा वाजता हा पेपर सुरू झाला. बोर्डाच्या नियमानुसार विद्यार्थ्याने वेळेपूर्वी अर्धा तास परीक्षा कक्षात उपस्थित राहणे बंधनकारक होते. विद्यार्थ्यांनी हा नियम काटेकोर पाळत लवकरच परीक्षा केंद्रांवर प्रवेश केला होता. विद्यार्थ्यांना परीक्षेचा ताण येऊ नये म्हणून काही शाळांनी त्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. 

बारावीची परीक्षा असल्याने अनेक विद्यार्थ्यांबरोबर पालकही आले होते. मनातील भीती दूर करण्यासाठी ते परीक्षा केंद्राबाहेर आपल्या पाल्याला टेन्शन घेऊ नको, असा धीर देताना दिसत होते. मित्र-मैत्रिणी एकेमकांना भेटून शुभेच्छा देत होते. प्रश्‍नपत्रिकेच्या बदललेल्या पॅटर्नची चर्चाही विद्यार्थ्यांमध्ये होती. 
पहिला पेपर दोन वाजता संपला आणि विद्यार्थी हसऱ्या चेहऱ्यांनी बाहेर पडले. त्यांचे हसू पेपर सोपा गेल्याचे सांगत होते. काही जणांनी वेळ पुरला नसल्याची खंत व्यक्त केली, तर काहींनी व्याकरणाचा भाग जरासा किचकट होता, असे सांगितले. एच. व्ही. देसाई कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी म्हणाले, ‘‘पेपर सोपा गेला आहे. अभ्यासाचे चांगले नियोजन केले होते. त्यामुळे उजळणी झालेली होती. सर्व प्रश्‍न सोडविले आणि पेपर वेळेत पूर्ण झाला.’

पेपर तपासणीवर बहिष्कार
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत सरकार दुर्लक्ष करीत असल्याने शिक्षकांनी पेपर तपासणीवर बहिष्कार टाकला आहे. कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने आज विभागीय मंडळाच्या अध्यक्षांना निवेदन दिले. परीक्षा सुरू झाल्यानंतर मुख्य नियामकांची सभा होते. इंग्रजी विषयाची ही सभाही आज झाली नाही. मागण्यांसदर्भात सरकारने निर्णय जारी केल्यानंतरच पेपर तपासणीचे काम सुरू करण्यात येईल, असे निवेदनात म्हटले आहे. त्यावर ए. एस. उगलमुगले, शरद दहिवाले, विजय शेवाळे आदींच्या सह्या आहेत.

पॅटर्न बदलला; पण पेपर सोपा
सर परशुरामभाऊ कनिष्ठ महाविद्यालयातील इंग्रजी शिक्षक दीपक कर्वे म्हणाले, ‘‘बारावीच्या भाषेच्या पेपरचा पॅटर्न यंदा बदलला आहे. आता कृतिपत्रिका आहेत. आजचा पेपर सोपा गेल्याचे विद्यार्थी सांगत होते. वेळ कमी पडल्याची काहींची चिंता होती. ज्यांनी व्यवस्थित वाचन केले, त्यांना नक्कीच पेपर सोपा गेला असेल.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com