Video : गोविंदबागेत आवाज राष्ट्रवादीचा; हजारो कार्यकर्ते पवारांच्या भेटीला

मिलिंद संगई
सोमवार, 28 ऑक्टोबर 2019

गेल्या अनेक वर्षांपासून दिवाळीच्या पाडव्याला शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे हे गोविंद बागेत कार्यकर्ते, नागरिक, पदाधिकारी यांना भेटतात, शुभेच्छा देतात ही परंपरा आहे.

बारामती शहर : दिवाळीच्या पाडव्याचे औचित्य साधून आज ज्येष्ठ नेते शरद पवार व पवार कुटुंबियांना शुभेच्छा देण्यासाठी बारामतीतील गोविंदबाग या निवासस्थानी राज्यातून हजारो कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली.

शरद पवार यांच्यासमवेत अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, पार्थ पवार, जय पवार हेही उपस्थित आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते गोविंद बागेत मोठ्या संख्येने आले होते.

- 'युती'च्या मनोमिलनानंतर ठरणार आघाडीची रणनीती

नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला घवघवीत यश मिळाल्याचे पार्श्‍वभूमीवर आज शरद पवार अजित पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी मराठवाडा, विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्रसह पुणे शहर व पिंपरी-चिंचवड मधूनही पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, आमदार यांनी उपस्थिती लावली होती.

गेल्या अनेक वर्षांपासून दिवाळीच्या पाडव्याला शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे हे गोविंद बागेत कार्यकर्ते, नागरिक, पदाधिकारी यांना भेटतात, शुभेच्छा देतात ही परंपरा आहे. यंदा विधानसभा निवडणुकीतील यशाच्या पार्श्वभूमीवर गोविंद बागेत प्रचंड गर्दी होती. मुख्य रस्त्यापासून ते पवारांच्या निवासस्थानापर्यंत प्रचंड मोठी रांग या ठिकाणी पाहायला मिळाली.

- पंढरपूर : विठुमाऊलीच्या गाभाऱ्याला 'ब्ल्यू डायमंड'चा साज! (व्हिडिओ)

मुख्य रस्त्यापासून ते पवार यांच्या निवासस्थानापर्यंत चार रांगांमधून नागरिक पवार यांच्या भेटीसाठी जात होते. कितीही वेळ लागला तरी पवार यांना भेटल्याशिवाय जायचेच नाही असा निग्रह मनाशी बाळगून याठिकाणी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित झालेले पाहायला मिळाले.

पुष्पगुच्छ तसेच मिठाई घेऊन पवार यांच्या भेटीला लोक आले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी असल्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणावर पक्षीय घोषणा देखील दिल्या जात आहेत. 

- शिवसेना, भाजप घेणार राज्यपालांची स्वतंत्र भेट; काय असेल?

गोविंद बाग येथे प्रचंड बंदोबस्त असताना देखील उत्साही कार्यकर्ते व लोकांना आवरताना पोलिसांची पार दमछाक झाली. अनेकदा रांग मोडून लोकांनी पुढे घुसण्याचा प्रयत्न केला , यामध्ये पोलीस व कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमकी घडल्या. एकाक्षणी पोलिसांचा बंदोबस्त तोडून कार्यकर्ते गोविंद घेतात घुसले रांगा मोडल्या यामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A huge crowd of NCP activists had gathered at Govind Bagh Baramati to wish Diwali to the Pawar family