सवाई गंधर्व महोत्सवाने अनुभवली स्वराविष्कारीची अभिजात उंची

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

पुणे : सायंकाळच्या स्वरांगणात रमणारा पुरिया कल्याण आणि अवीट असा गोरख कल्याण या रागांच्या सानिध्यात आज सवाई गंधर्व महोत्सवाने स्वराविष्कारीची अभिजात उंची अनुभवली... मधुवंतीच्या गोडव्यात हा उत्सव चिंब भिजला आणि कौशी कानडाच्या गहिऱ्या रंगातही माखून निघाला... 

पुणे : सायंकाळच्या स्वरांगणात रमणारा पुरिया कल्याण आणि अवीट असा गोरख कल्याण या रागांच्या सानिध्यात आज सवाई गंधर्व महोत्सवाने स्वराविष्कारीची अभिजात उंची अनुभवली... मधुवंतीच्या गोडव्यात हा उत्सव चिंब भिजला आणि कौशी कानडाच्या गहिऱ्या रंगातही माखून निघाला... 

महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी पहिल्या सत्राची सुरवात बनारस आणि ग्वाल्हेर घराण्याच्या गायिका रिता देव यांनी मधुवंती रागाने केली. या रागात ख्यालाची बढत करताना त्यांनी आलाप-ताना, सरगम, लयकारी यांची पेरणी करीत त्यांनी दोन्ही घराण्याच्या गायन शैलीचा सुरेल प्रत्यय दिला. नंतर त्यांनी याच रागातील ‘पायलिया मोरी बाजे’ ही ठुमरी सादर केली. त्यानंतर मिश्र तिलंग रागात ‘सजन तुम काहे नेह लगाये’ या ठुमरीची बढत त्यांनी विलंबित ख्याल अंगाने करीत रसिककंडून दाद मिळविली. गायनाचा समारोप त्यांनी दादऱ्याने केला. तबल्यावर भरत कामत आणि संवादिनीवर मिलिंद कुलकर्णी यांच्या पूरक साथीने गायनात अधिक रंगत आली. 

हैदराबादच्या दरबारी गायकांच्या सहाव्या पिढीतील युवागायक सौरभ साळुंके यांनी राग पुरिया कल्याण मांडत सवाईच्या दुसऱ्या दिवसाची सायंकाळ रोचक बनविली. संयत आलाप आाणि वेगवान तानाचा पुरेपूर वापर करीत त्यांनी या सायंकालीन रागाची रंजक मांडणी केली. त्रितालातील ‘जाने दे जाने दे अब घरवा’ पेश करतानाही तानांचा वापर केला. नंतर ‘बरसन लागी’ हा दादरा आणि पं. भीमसेन जोशी यांच्या तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल या अभंगाने त्यांनी गायनाचा समारोप केला. त्यांच्या साथीला तबल्यावर प्रशांत पांडव आणि संवादिनीवर अविनाश दिघे यांनी साथसंगत केली. 

संतूरवादक राहुल शर्मा यांनी देखील अवीट गोडीचा गोरख कल्याण या सायंकालीन राग मांडत महोत्सवाचा दुसऱ्या दिवशीचा उत्तरार्ध उंचीवर नेला. या रागात आलाप जोड झालानंतर मध्यलयीत नऊ मांत्रांनामध्ये एक रचना आणि द्रूत तीन तालातील रचना सादर केली. तबलावादक मुकुंदराज देव यांच्या साथीने त्यांनी रचनांची सुगम मांडणी करून वातावरणाला तजेला दिलाच तसेच राहुल यांनी बोटांनी स्वरांवर न्यास करीत दोन वाद्यांच्या जुगलबंदीचा आस्वादक आनंद रसिकांना दिला. मुकूंदराज देव यांच्या देखील शैलीदार तबलावादनाला रसिकांकडून टाळ्यांची भरभरून दाद मिळाली. 

सवाईच्या दुसऱ्या दिवशीचा समारोप पं. अजय पाेहनकर यांच्या गायनाने झाला. सुरवातीला त्यांनी कौशी कानडाचे रंग रसिकांसमोर उलगडले. त्यांना संवादिनीवर सुधीर नायक आणि तबल्यावर मुकुंदराज देव यांनी साथसंगत केली.

Web Title: huge response for sawai gandharva festival