वाहतूक कोंडीमुळे अनेकांचे टळले विवाह, साखरपुडा मुहूर्त

डी. के. वळसे पाटील
रविवार, 10 फेब्रुवारी 2019

''मंचरच्या बाह्य वळणांचा प्रश्न मार्गी लागल्यानंतरच वाहतूक कोंडीचा प्रश्न सुलभ होणार आहे. वाहतूक कोंडीच्या समस्येला नागरिकांना वारंवार तोंड द्यावे लागते. तांबडेमळा, शेवाळवाडी, निघोटवाडी, मंचर, एकलहरे या भागातून जाणाऱ्या चौपदरीकरण रस्त्याच्या बाह्यवळणाची कामे त्वरित सुरु करावी. त्यानंतरच मंचरकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होईल.''

- प्रमिला गणपतराव टेमगिरे, सामाजिक कार्यकर्त्या

मंचर : पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गवर रविवारी (ता. १०) मंचर (ता.आंबेगाव) येथे सकाळी व दुपारनंतर वाहतूक कोंडीच्या समस्येला नागरिकांना तोंड द्यावे लागले. गेटवेल हॉस्पिटल, मुळेवाडी चौक, पिंपळगाव फाटा ते जीवन मंगल कार्यालय या मार्गावर वारंवार वाहतूक कोंडी झाली. वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. प्रवासाला विलंब लागत असल्याने अनेकांचे साखरपुडा, टिळा व लग्नाचे मुहूर्त टळले. 

मंचरचा आठवडे बाजार रविवारी भरतो. त्यातच लग्नतिथ मोठी असल्यामुळे वाहनांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली होती. अवजड यंत्रसामग्री नेणारी वाहने व कंटेनरची संख्याही या रस्त्यावर अधिक आहे. तसेच चाकण औद्योगिक वसाहतीतील उत्पादित माल गुजरात व मध्यप्रदेशमध्ये नेण्यासाठी या महामार्गाचा वापर केला जातो. मंचर परिसरात एकूण आठ मंगल कार्यालये आहेत. वऱ्हाडी मंडळींची संख्या अधिक होती. सकाळी अकरा वाजता अतिशय धिम्या गतीने वाहतूक सुरु होती.

दुपारी तीन ते पाच या वेळेत वाहतूक कोंडी झाली होती. शिवशाही, एशियाड, एसटी व खासगी लक्झरी बसेसमधील प्रवाश्यांना वाहतूक कोंडीचा फटका बसला. महिला, मुले व ज्येष्ठ नागरिकांचे हाल झाले. मंचर पोलिस ठाण्याचे वाहतूक विभागाचे पोलिस वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न करत होते. पण अपुरा पडत असलेल्या रस्त्यामुळे पोलिसही हतबल झाले होते.

तसेच काही बेशिस्त वाहनचालक वाहतूक नियमाकडे दुर्लक्ष करून रस्त्याच्या विरुद्ध दिशेनेही आपले वाहन पुढे नेण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे समोरून येणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळेही वाहतूक कोंडीत भर पडत होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Huge Traffic Jam in Manchar