दम मारो दमऽऽ...

Hukka-Parlour
Hukka-Parlour

पुणे - शहरातील उच्चभ्रू समजणाऱ्या कोरेगाव पार्क, विमाननगर, कल्याणीनगरसह अनेक ठिकाणी रात्रभर हुक्का (शिशा) पार्लर जोरात सुरू आहेत. पार्लरमध्ये येणाऱ्यांमध्ये अठरा ते वीस वयोगटातील मुलामुलींची संख्या अधिक आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पोलिस आयुक्तालयातील परिमंडळ चारमध्ये पोलिस उपायुक्त पंकज देशमुख यांनी जुगार, मटका, अमली पदार्थ विक्री यावर कडक निर्बंध आणले आहेत. त्यांनी परिमंडळअंतर्गत येणाऱ्या चतु:श्रृंगी, येरवडा, विमाननगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे बंद असल्याचा दावा केला होता. मात्र गुरुवारी या परिसरातील अनेक हॉटेल्समध्ये उघडपणे हुक्का जोरात सुरू होते. 

शहरातील हॉटेल्स रात्री एक वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी नुकतीच मिळाली आहे. मात्र कल्याणीनगर, विमाननगर परिसरातील अनेक हॉटेल्समध्ये सकाळी सहा वाजेपर्यंत हुक्का पार्लर सुरू असतात. या हॉटेलचालकांना रात्रगस्त कोणत्या अधिकाऱ्यांची आहे, याची अगोदरच माहिती असते. त्यामुळे सहायक पोलिस आयुक्त, उपायुक्त यांच्या रात्रगस्तीच्या वेळी हॉटेल्समधील दिवे बंद केले जातात. मात्र आतमध्ये युवक धुरात रंगलेले असतात.

कुंपणच खातंय शेत 
कल्याणीनगर येथील आयटी कंपनीच्या टेरेसवर चालणाऱ्या हॉटेलमध्ये गुरुवारी हुक्का पार्लर जोरात सुरू होता. अशा हॉटेलवर कारवाई करण्याची अपेक्षा असताना पोलिस ठाण्यातील तपास अधिकारीच मित्राबरोबर निवांत भोजनाचा आनंद घेत असल्याचे दृष्य होते.

तरुणाईचा ओढा

  • शिशाची किंमत साडेआठशे ते हजार रुपये 
  • हुक्का ओढणाऱ्यांमध्ये आयटी कर्मचाऱ्यांची मोठी संख्या
  • अठरा ते वीस वर्षे वयोगटातील मुलामुलींचीही पावले पार्लरकडे
  • सकाळी सहापर्यंत हॉटेल्स सुरू

हुक्क्यामध्ये निकोटीन असते, जे सिगारेट आणि तंबाखूत असते. हुक्का कमी धोकादायक असल्याचा अनेकांचा गैरसमज आहे; पण हुक्का सिगारेटप्रमाणेच घातक आहे.
- मुक्ता पुणतांबेकर, संचालक, मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र

परिमंडळ चारमध्ये जुगार, मटका, अमली पदार्थ अशा अवैध धंद्यांवर कारवाई करून अनेकांचे कंबरडे मोडले आहे. तरीसुद्धा काही ठिकाणी अवैध धंदे, हुक्का पार्लर सुरू असल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
- पंकज देशमुख, उपायुक्त, परिमंडळ चार

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com