...या दबंग पोलिस अधिकाऱ्याचे अनोखे शतक! 

मिलिंद संगई
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

एखादा धडाकेबाज अधिकारी तत्परतेने कारवाई करून अवैध व्यवसायांना प्रतिबंध कशा पद्धतीने करू शकतो, याचे उदाहरण बारामतीचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक जयंत मीना यांनी घालून दिले आहे. विचारविनिमय व बैठकांपेक्षाही माहिती गोळा करून थेट कारवाईवर त्यांचा भर आहे. बारामतीत नियुक्तीनंतर काही महिन्यातच त्यांनी अवैध व्यवसायावरील कारवाईचे शतक पूर्ण केले आहे. 

बारामती (पुणे) : बारामतीतील पोलिस दलात सध्या एका शतकाची चर्चा सुरू आहे. हे शतक आहे, अवैध व्यवसायांवरील कारवाईची. एखादा धडाकेबाज अधिकारी तत्परतेने कारवाई करून अवैध व्यवसायांना प्रतिबंध कशा पद्धतीने करू शकतो, याचे उदाहरण बारामतीचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक जयंत मीना यांनी घालून दिले आहे. विचारविनिमय व बैठकांपेक्षाही माहिती गोळा करून थेट कारवाईवर त्यांचा भर आहे. बारामतीत नियुक्तीनंतर काही महिन्यातच त्यांनी अवैध व्यवसायावरील कारवाईचे शतक पूर्ण केले आहे. 

बारामतीच्या अतिरिक्त पोलिस अधीक्षकांच्या कार्यक्षेत्रात बारामती शहर, बारामती तालुका, वडगाव निंबाळकर, इंदापूर, वालचंदनगर, भिगवण, दौंड, यवत, शिरूर, रांजणगाव, शिक्रापूर, सासवड, जेजुरी, भोर, राजगड या पंधरा पोलिस ठाण्यांचा समावेश आहे. 

जवळपास प्रत्येक पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या अवैध धंद्याची गोपनीय माहिती काढून जयंत मीना यांच्या पथकाने धडक कारवाई केली आहे. पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप जाधव, सुरेंद्र वाघ, स्वप्नील अहिवळे, दशरथ कोळेकर, शर्मा पवार, विशाल जावळे, भाऊसाहेब मोरे, रॉकी देवकाते यांचा या पथकात समावेश आहे. 

मीना यांची नियुक्ती झाल्यानंतर 114 अवैध व्यवसायांविरूद्ध धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये सात कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या मध्ये अवैध दारू, जुगार, मटका व्यवसायासह प्राण्यांना क्रूरतेने वागविणे, गुटखा व आर्म ऍक्‍टसह वाळू व्यवसायावरही धडक कारवाई केली गेली. 

स्थानिक पोलिसांचे पितळ उघडे! 
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक कारवाई करून जात असल्यामुळे स्थानिक पोलिसांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणाऱ्या या कारवाया ठरल्या आहेत. त्यातून स्थानिक पोलिसांची कार्यक्षमताच उघड होते. त्यांच्या या कारवाईची कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके व जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी दखल घेत पारितोषिकही जाहीर केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hundreds of illegal businesses are being prosecuted by a police officer in Baramati