संसार सावरायची काळजी!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

सलग पाऊस कोसळल्याने पुणे शहरात पूरस्थिती निर्माण झाली. मुळा-मुठा नदीपात्रालगतच्या तब्बल सव्वाअकराशे घरांत पाणी शिरले. यामुळे हातांवर पोट असणाऱ्या शेकडो जणांचे संसार पाण्यात गेले.

पुणे - सलग पाऊस कोसळल्याने पुणे शहरात पूरस्थिती निर्माण झाली. मुळा-मुठा नदीपात्रालगतच्या तब्बल सव्वाअकराशे घरांत पाणी शिरले. यामुळे हातांवर पोट असणाऱ्या शेकडो जणांचे संसार पाण्यात गेले.

सुमारे सव्वापाच हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. पावसाचा जोर आणि धरणातील विसर्ग वाढल्याने पूरस्थिती ओढविल्याचे दिसून आले. पण नदीपात्रातील अतिक्रमणांनीही शहरालगतच्या उपनगरांतील लोकवस्त्यांना पाण्याने वेढा घातल्याची परिस्थितीही नजरेसमोर आली.

शहरातून वाहणाऱ्या मुळा-मुठा नदीपात्राच्या ४२ किलोमीटरच्या प्रवाहात ११ ठिकाणी पाणी घुसले. पूरस्थिती ओसरताच आरोग्य खात्याने स्वच्छतेची मोहीम हाती घेतली. मात्र घरात आल्यानंतर चूल कशी पेटवायची, पाण्यात वाहून गेलेला संसार  कसा सावरायचा याचीच चिंता आता रहिवाशांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. 

  तातडीच्या मदतीची गरज
घरे पाण्यात गेल्याने लोकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यांची अपेक्षा आहे, ती तत्काळ मदत मिळण्याची. राज्य सरकार आणि महापालिकेकडून साधे पंचनामेही झाले नाहीत. त्यामुळे पूरग्रस्तांसाठी मदतीचा प्रश्‍नच लांब राहिला आहे. तातडीची मदत म्हणून प्रत्येक कुटुंबाला पाच हजार रुपये आणि घरांचे नुकसान म्हणून सहा हजार असे ११ हजार रुपये मिळतील, असे सांगण्यात येत आहे. मात्र पुराच्या पाण्याने झालेले नुकसान पाहता घरांसाठी किमान २० ते २५ हजार रुपयांची मदत मिळावी, अशी पूरग्रस्तांची अपेक्षा आहे. 

  नदीकाठचा भाग सुरक्षित करा
धरणातून केवळ ३५ ते ४० हजार क्‍युसेक वेगाने विसर्ग होऊनही एवढ्या प्रमाणात घरांत पाणी शिरत असल्याने रहिवाशांमध्ये घबराट पसरली आहे. त्यामुळे नदीकाठचा भाग सुरक्षित करण्याची त्यांची मागणी आहे. केवळ पूरस्थिती निर्माण झाल्यानंतरच लक्ष दिले जाते. एरवी, सुरक्षिततेच्या उपाययोजना होत नाही, अशी तक्रार रहिवाशांची आहे. दुसरीकडे, झोपडपट्ट्यांमधील सांडपाणी वाहिन्या तुंबल्याने गटाराचे पाणी घरात येत असल्याचेही निदर्शनास आणून दिले.

घरातले पाणी चार दिवसानंतर कमी झाले आहे. आता आम्ही सर्वजण पुन्हा घरात राहायला जाऊ, पण आमचा घरातील सगळे साहित्य पाण्यात वाहून गेले आहे. त्यामुळे आता जगायचे असे याची चिंता आहे. आम्हाला मदत काय होईल, याबाबत कोणीच काही बोलत नाही.
- अनसूया कदम, रहिवासी, पाटील इस्टेट


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hundreds of people Flood affected