लेण्याद्रीला पुरातत्व विभागाच्या प्रवेशशुल्क विरोधात उपोषण सुरू

दत्ता म्हसकर
गुरुवार, 4 एप्रिल 2019

दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकडून पुरातत्व विभाग आकारत असलेल्या प्रवेश शुल्काविरोधात सुरु आहे उपोषण.

जुन्नर : श्री क्षेत्र लेण्याद्री ता.जुन्नर येथे अष्टविनायक श्री गिरीजात्मजकाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकडून पुरातत्व विभाग आकारत असलेल्या प्रवेश शुल्काच्या तसेच स्थानिक ग्रामस्थ व लेण्याद्री देवस्थान ट्रस्टच्या जागेत पुरातत्व विभागाने केलेल्या अतिक्रमण विरोधात संपूर्ण स्वराज्य संस्थेचे अध्यक्ष हर्षल जाधव व सहकाऱ्यांनी उपोषण सुरू केले आहे.

उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे. जाधव यांच्यासह गणेश लोखंडे, मारूती पारधी, सोमा आधान, संजय भालेकर,नवनाथ काळे,रुपेश जगताप उपोषणास बसले आहेत. गोळेगाव ग्रामस्थ, लेण्याद्री देवस्तान ट्रस्ट ,विविध सामाजिक संस्था यांनी उपोषणास पाठिंबा दिला  असून लेण्याद्री येथील व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवली आहेत. आमदार शरद सोनवणे यांनी उपोषणस्थळी येऊन पुरातत्व विभागाचे अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली.

नगराध्यक्ष शाम पांडे, लेण्याद्री देवस्तान ट्रस्टचे सचिव शंकरराव ताम्हाणे, जितेंद्र बिडवई, मधुकर काजळे आदींनी उपोषणास पाठिंबा दिला आहे. पुरातत्व विभागाने बांधलेली संरक्षक भिंत तसेच  प्रवेश शुल्क तिकीट खिडकीची इमारत स्थानिक ग्रामस्थ व लेण्याद्री देवस्थान ट्रस्टच्या जागेत  बांधली असल्याचे देवस्थान ट्रस्ट व ग्रामस्थांचे म्हणणे आहे. हे अतिक्रमण काढून टाकावे. तसेच गणेश दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकडून प्रवेश शुल्क घेण्यात येऊ नये, अशी मागणी हर्षल जाधव व लेण्याद्री देवस्थान ट्रस्टचे सचिव शंकर ताम्हाणे यांनी केली आहे.

पंचवीस रुपये प्रवेशशुल्क हा पुरातत्व विभागाचा जिझिया कर असून, येथे पुरातत्व विभाग विकास काम करत नाही व इतरांच्या कामात खोडा घालत असल्याची भावना उपोषणकर्त्यांनी व्यक्त केली.

Web Title: Hunger Strike against Entry Fee on Historic Place in Lenyandri