पतीचे यकृत, किडनी, हृदय पत्नीने केले दान

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 जुलै 2019

आपल्या कर्तृत्वाने, सचोटी व कष्टाने व बंधूच्या मदतीने तीन मेडिकल दुकानांची शृंखला पुण्यासारख्या शहरात अल्पावधीतच निर्माण करणाऱ्या पतीचे ऐन तारुण्यात निधन झाले. पतीच्या आठवणी कायमस्वरूपी जपाव्यात, या भावनेने विवाहितेने पतीचे यकृत, किडनी, हृदय व अन्य अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. हे पुण्यकर्म केले आहे सीमा तुषार कोतकर यांनी.

आठवणी जपण्यासाठी निर्णय; चार जणांना दिले जीवदान
पुणे - आपल्या कर्तृत्वाने, सचोटी व कष्टाने व बंधूच्या मदतीने तीन मेडिकल दुकानांची शृंखला पुण्यासारख्या शहरात अल्पावधीतच निर्माण करणाऱ्या पतीचे ऐन तारुण्यात निधन झाले. पतीच्या आठवणी कायमस्वरूपी जपाव्यात, या भावनेने विवाहितेने पतीचे यकृत, किडनी, हृदय व अन्य अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. हे पुण्यकर्म केले आहे सीमा तुषार कोतकर यांनी.

कोथरूड येथे वास्तव्यास असणारे तुषार सुभाष कोतकर (वय 36) यांनी आपल्या कर्तृत्वाने मेडिकल व्यवसायात नावलौकिक प्राप्त केला होता. तुषार मूळचे गोंडगाव (ता. भडगाव, जि. जळगाव) इथले. वडिलांची कर्मभूमी मालेगाव (जि. नाशिक). मामांच्या मदतीने तुषार यांचे पुणे शहरात आगमन झाले अन्‌ बघता बघता आपल्या सचोटीने तीन मेडिकल दुकानांची शृंखला तयार झाली. कुटुंबातील कुलदीपक तुषारला 11 जुलै रोजी ब्रेन स्ट्रोक झाला अन्‌ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमधील डॉक्‍टरांनी प्रयत्नांची शर्थ केली. डॉक्‍टरांनी दिलेली 72 तासांची कालमर्यादा आज (ता. 14) दुपारी तीन वाजत संपली. या कालावधीत तुषारकडून काहीही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर डॉक्‍टरांनी त्याला "ब्रेन डेड' घोषित केले, अशा परिस्थितीत त्यांची पत्नी सीमा आणि कोतकर कुटुंबीयांनी तुषारचे यकृत, किडनी, हृदय व अन्य अवयव दान करून तीन ते चार जणांना जीवदान देण्याचा निर्णय घेतला. अवयवदानाचे सोपस्कार पाडण्यास काही तास लागणार आहेत. तुषार याच्यावर उद्या (ता.15) पुण्यातच अंत्यसंस्कार केले जाणार असल्याचे कुटुंबीयांकडून सांगण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Husband Liver Kidney Heart Donate by Wife Motivation