पती-पत्नीच्या नात्यात दुरावा

अनिल सावळे 
बुधवार, 1 फेब्रुवारी 2017

महत्त्वाच्या टिप्स
पती-पत्नीमध्ये सुसंवाद आवश्‍यक
एकमेकांना समजून घेण्याची गरज
कुटुंबासाठी पुरेसा वेळ देणे गरजेचे
लिव्ह इनमधील मैत्री एका पातळीपर्यंत असणे अपेक्षित
मुला-मुलींनीही आई-वडिलांची मानसिकता लक्षात घेणे आवश्‍यक

पुणे - विवाहबाह्य संबंध, फेसबुक-मोबाईलवरील चॅटिंगमुळे एकमेकांबद्दल घेतला जाणारा संशय आणि बदलती जीवनशैली अशा विविध कारणांमुळे अलीकडच्या काळात पती-पत्नींच्या नात्यात दुरावा निर्माण होत आहे. तसेच वाद होत असल्याचा निष्कर्ष गुन्हे शाखेच्या महिला साह्य कक्षात येणाऱ्या तक्रारींवरून काढण्यात आला आहे.

खासगी बाबी मोबाईल चॅटिंगद्वारे मित्र-मैत्रिणींसोबत शेअर करीत असल्याच्या कारणावरून पत्नीचा खून केल्याची धक्‍कादायक घटना हडपसर परिसरात नुकतीच घडली. सोशल मीडिया हे आधुनिक युगात आवश्‍यक साधन असूनही त्याचा योग्य वापर होत नसल्यामुळे आता हे साधनच कौटुंबिक वादाचे कारण बनत असल्याच्या तक्रारी महिला साह्य कक्षात येत आहेत.

पोलिस आयुक्‍तालयातील महिला साह्य कक्षाकडे मागील वर्षभरात एक हजार ८४९ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यात पती-पत्नींमधील वेगवेगळ्या कारणांवरून सुरू असलेले कौटुंबिक वाद, लिव्ह इन रिलेशन्समधील युवक-युवतींच्या तक्रारींचा प्रामुख्याने समावेश आहे. यावरून शहरात दररोज सरासरी पाच ते सहा कुटुंबांतील वाद सामोपचाराने मिटविण्याच्या उद्देशाने महिला साह्य कक्षाकडे येत आहेत.

महिला साह्य कक्षात पुरुषांवरही अन्याय झाल्याबाबत तक्रारी येत आहेत. परंतु हे प्रमाण एकूण तक्रारींच्या तुलनेत कमी आहे. पत्नीवर संशय, पत्नीकडून वाढत्या अपेक्षा, सासू-सासऱ्याला सांभाळत नाही, अशा स्वरूपाच्या तक्रारी पुरुषांकडून येत आहेत. तर दुसरीकडे विवाहबाह्य संबंधांचे प्रमाण वाढत आहे. दुसरे लग्न आणि अनैतिक संबंध ही वादाची प्रमुख कारणे आहेत. मोबाईलवर सतत चॅटिंग आणि पतीकडून कुटुंबासाठी पुरेसा वेळ न दिल्यामुळे सुखी संसारात वादाची ठिणगी पडत आहे. विशेषत आयटी कंपन्यांमध्ये काम करण्याच्या वेळा रात्रीच्या असतात. कामाचा ताण आणि वाढत्या संशयामुळे आपसांत वाद होत आहेत. 

अनुचित घटना टाळण्यासाठी समाजात, घरी आणि कार्यालयात अलर्ट राहणे गरजेचे आहे. आई-वडिलांना आपल्या मुला-मुलींच्या वागण्यातील फरक लक्षात आला पाहिजे. मुला-मुलींनी विश्‍वासाने पालकांसोबत खासगी बाबी शेअर कराव्यात. त्यासाठी पालकांनीही मुला-मुलींसोबत मित्रत्वाने आणि मोकळेपणाने बोलले पाहिजे.  
- सीमा मेहेंदळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, महिला साह्य कक्ष

पुरेसे कर्मचारी हवेत 
महिला साह्य कक्षातील तक्रार अर्जांची संख्या पाहता त्याचा निपटारा करण्यासाठी पुरेसा कर्मचारी वर्ग नाही. तसेच केवळ आठच समुपदेशक आहेत. त्यामुळे अनेक दांपत्यांना सामोपचाराने प्रकरण मिटविण्यासाठी ताटकळत बसावे लागते. त्यासाठी महिला साह्य कक्षात पुरेसा पोलिस कर्मचारी वर्ग आणि समुपदेशक नेमावेत, अशी मागणी होत आहे.

लिव्ह इनचे प्रमाण वाढले
महिला साह्य कक्षाच्या प्रमुख वरिष्ठ निरीक्षक सीमा मेहेंदळे यांच्या म्हणण्यानुसार, सध्या नव्या पिढीकडून पाश्‍चात्त्य संस्कृतीचे अनुकरण केले जात आहे. आई-वडिलांना नोकरीनिमित्त दिवसभर घराबाहेर राहावे लागते. कुटुंब व्यवस्था ढासळत चालली आहे. त्याचे दुष्परिणाम महाविद्यालयीन युवक-युवतींमध्ये दिसून येत आहेत. लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या जोडप्यांचे प्रमाण वाढले आहे. वयाची विशी ओलांडण्यापूर्वीच काही युवक-युवती लिव्ह इनमध्ये राहत असल्याचे सांगतात. मात्र नंतर मुलाने लग्नास नकार दिल्यावर या मुली तक्रार अर्ज घेऊन महिला साह्य कक्षाकडे येतात.

महत्त्वाच्या टिप्स
पती-पत्नीमध्ये सुसंवाद आवश्‍यक
एकमेकांना समजून घेण्याची गरज
कुटुंबासाठी पुरेसा वेळ देणे गरजेचे
लिव्ह इनमधील मैत्री एका पातळीपर्यंत असणे अपेक्षित
मुला-मुलींनीही आई-वडिलांची मानसिकता लक्षात घेणे आवश्‍यक

Web Title: Husband-wife relationship distances