पाणी धरून ठेवणार हायड्रोजेल 

pune.jpg
pune.jpg

बारामती : सध्याच्या दुष्काळी स्थितीत शेतीला पाण्याची टंचाई भरून निघणारी साधने हवी आहेत. याचसाठी आयआयटी मुंबईने संशोधित केलेले इरिगेशन शेड्यूलिंग मशिन किंवा पाणी धरून ठेवणारे हायड्रोजेलसारखी साधने आता बाजारात येऊ लागली आहेत.  

पाणी बचत हा दुष्काळाच्या आपत्तीवरील प्रभावी व्यवस्थापनाचा भाग आहे. यंदाच्या कृषिक प्रदर्शनात जी शेतीची प्रात्यक्षिके घेण्यात आली आहेत, त्यामध्ये आधुनिकता आणणारी तंत्रे समाविष्ट करण्यात आली आहेत. ठिबक सिंचन आले, परंतु हे तंत्रज्ञान कमी पाण्याच्या ठिकाणी अधिक उपयोगी ठरण्यासाठी आता हायड्रोजेल हे नवे तंत्र आले आहे. मक्‍याच्या स्टार्चपासून तयार केलेले हे तंत्र एकदा शेतात रोपाचे आळे असलेल्या ठिकाणी दिल्यानंतर त्याचा प्रभाव सहा महिने टिकतो. हे हायड्रोजेल त्याच्या वजनाच्या चारशे पट दिलेले कोणतेही विद्राव्य खतापासून ते गोमूत्र, पाण्यापर्यंतचा प्रत्येक थेंब व प्रत्येक कण झाडाच्या मुळाशी साठवून, धरून ठेवते.
त्यामुळे जमीन भुसभुशीत राहते. वाफशामध्ये राहते व अन्नद्रव्याचा वापर अधिक कार्यक्षमतेने होऊन जमीन व पीक अतिरिक्त उत्पादन देते. साधारणतः 25 टक्‍क्‍यांपर्यंत उत्पादनात वाढ होते, असा या तंत्राच्या संशोधकांचा दावा आहे. वातावरण, तापमान किंवा अतिपावसाचा कोणताही परिणाम झाडावर होऊ देत नसल्याने झाडाची नैसर्गिक वाढ होते. तापमानातील चढ-उतार कितीही तीव्र असला, तरी त्याचा कोणताही परिणाम पिकावर होऊ देत नाही. या साधनासाठी एकरी अडीच हजारांपर्यंत खर्च येतो. 

पाणी व्यवस्थापन मोबाईलवर 
पाणी व्यवस्थापनात नवी हरितक्रांती आणणारी नवनवी साधने शेतीत येऊ लागली आहेत. आतापर्यंत शेतकऱ्याने शेतात जाऊन विहिरीवरील वीजपंपाचे बटण दाबण्याचे दिवस संपले. आता मोबाईलवरून शेतातील विहिरीवरील पंप सुरू किंवा बंद होतात. आता त्यापुढे एक पाऊल टाकून शेतात वाफसा आहे की नाही, शेतातील पिकाचे पाण्याचे प्रमाण किती आहे किंवा आता पाण्याची गरज कशी आहे, हे दाखविणारे तंत्र आता शेतात आले आहे. हे तंत्र शेतातील पाण्याची क्षमता सांगते. पाणी नसेल; तर किती दिवसांत हे पीक जळून जाईल, असा इशारा देते. एवढेच नाही, तर त्या जमिनीच्या क्षमतेनुसार अधिक पाणी होऊ लागले, तरी तेही निदर्शनास आणून देऊ शकते. त्याचा संदेश शेतकऱ्याच्या मोबाईलवर येतो. त्यातून शेतकऱ्यास आपले पीक व पाण्याची गरज याची माहिती मिळू शकते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com