मी कॉंग्रेस सोडणार नाही ः आमदार संग्राम थोपटे 

किरण भदे
शनिवार, 27 जुलै 2019

मी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या विरोधकांकडून जाणीवपूर्वक पसरविल्या जात आहेत.त्या केवळ अफवा असून मी कॉंग्रेस सोडणार नाही.

 

वेल्ह्यात पक्षाच्या वतीने बूथ कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन 

नसरापूर ः ""थोपटे आणि कॉंग्रेस हे एक समीकरण आहे.पक्षाने माझ्या कुटुंबाला व मला भरपूर दिले आहे,त्यामुळे कॉंग्रेस सोडून मी कोठेही जाणार नाही,''असे आमदार संग्राम थोपटे यांनी सांगितले. 

वेल्हे येथे तालुका कॉंग्रेस बूथ कमिटी कार्यकर्ता मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यात आमदार संग्राम थोपटे बोलत होते. या वेळी जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे, दिनकर धरपाळे, सभापती संगीता जेधे, उपसभापती दिनकर सरपाले, चंद्रकांत शेंडकर, सीमा राऊत, महिला अध्यक्षा आशा रेणुसे,युवक अध्यक्ष युवराज शेंडकर,दिलीप लोहकरे आदींसह कॉंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

थोपटे म्हणाले की,मी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या विरोधकांकडून जाणीवपूर्वक पसरविल्या जात आहेत.त्या केवळ अफवा असून मी कॉंग्रेस सोडणार नाही.वेल्हे तालुक्‍याच्या विकासात कॉंग्रेसचाच पुढाकार असून,विरोधक निव्वळ भूलथापा मारत आहेत.तालुक्‍यातील रस्त्यासाठीही मोठ्या प्रमाणात निधी मंजूर केला असून,अनेक कामे झाली आहेत.बूथ कमिटीच्या कार्यकर्त्यांनी ही कामे जनतेपर्यंत पोचवावीत,असे आवाहन त्यांनी केले. 

दिलीप बाठे म्हणाले की, आमदार थोपटे यांच्या माध्यमातून 70 ते 80 कोटींची कामे झाली आहेत. याचे श्रेय मात्र विरोधक घेत आहेत. कार्यकर्त्यांनी सतर्क राहून जनतेसमोर वस्तुस्थिती मांडावी. 

नलावडे यांनी सांगितले की, आमदार थोपटे यांचे काम तळागाळापर्यंत पोचले असून, त्यामुळेच जनता त्यांच्या पाठीशी आहे. कार्यक्रमाचे नियोजन युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष युवराज शेंडकर, गणेश जागडे, अमोल पडवळ, नीलेश पवार, संतोष लिम्हण, प्रमोद पडवळ, रमेश मरगळे, दीपक धुमाळ आदी युवा कार्यकर्त्यांनी केले होते. दिनकर धरपाळे यांनी आभार मानले. 

बूथप्रमुखांना विशेष प्रशिक्षण 
"मेरा बूथ सब से मजबूत' असे घोषवाक्‍य घेऊन कॉंग्रेसच्या वतीने प्रचार होणार असून, बूथप्रमुखांना विशेष प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यासाठी एका निवडणूक मॅनेजमेंट कंपनीची नियुक्त करण्यात आली असून, विजय बनकर हे त्यांच्या खास शैलीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत आहेत. भोर विधानसभा निवडणुकीत प्रथमच अशा टीमचा वापर करण्यात येत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: I am not leave congrass : thopate