Vidhan Sabha 2019 : बंडखोरी न करण्याचे इच्छुकांचे वचन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

पक्षश्रेष्ठींच्या आदेशावरून पुणे शहरात पक्षाच्या वाट्याला आलेल्या मतदारसंघातील इच्छुकांची एकत्रित बैठक सोमवारी काँग्रेसच्या वतीने घेण्यात आली.

विधानसभा 2019
पुणे - पक्षश्रेष्ठींच्या आदेशावरून पुणे शहरात पक्षाच्या वाट्याला आलेल्या मतदारसंघातील इच्छुकांची एकत्रित बैठक सोमवारी काँग्रेसच्या वतीने घेण्यात आली. ‘कोणालाही उमेदवारी मिळाली, तरी मी बंडखोरी करणार नाही,’ असा शब्द या वेळी सर्वच इच्छुकांकडून घेण्यात आला. दरम्यान, उमेदवारी मिळावी, यासाठी काही इच्छुकांनी मुंबई, दिल्लीवाऱ्या सुरू केल्या असून, काही इच्छुकांनी स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करून त्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन केले.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यात काँग्रेसच्या वाट्याला कसबा, पुणे कॅंटोन्मेंट आणि शिवाजीनगर हे तीन मतदारसंघ आले आहेत. या तिन्ही मतदारसंघांत पक्षाकडून इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यांच्यात एकमत घडवावे, यासाठी पक्षश्रेष्ठींनी इच्छुकांच्या एकत्रित बैठक घ्याव्यात, अशा सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार आज शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी इच्छुकांच्या स्वतंत्रपणे बैठक घेतल्या. पर्वती विधानसभा मतदारसंघ पक्षाकडे घ्यावा, अशी मागणी इच्छुकांनी केली. यासंदर्भात पक्षश्रेष्ठींकडे आग्रह धरला जाईल, असे आश्‍वासन बागवे यांनी 

दिले. दरम्यान, तीनपैकी एका मतदारसंघात महिलांना संधी मिळावी, अशी मागणी इच्छुक महिला उमेदवारांनी केली.

हडपसरची मागणी
कोणत्याही परिस्थितीत हडपसर मतदारसंघ काँग्रेसलाच मिळाला पाहिजे; अन्यथा मोर्चा काढण्याचा निर्णय पक्षाचे नेते माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्यात घेण्यात आला. काँग्रेसचे खच्चीकरण करण्याची पद्धतीशीरपणे मोहीम राबविली जात आहे. त्याला प्रदेशपातळीवरील काँग्रेस नेत्यांनी खतपाणी घालू नये. त्यामुळे काँग्रेसमध्येच राहून काँग्रेस संपविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना संपविण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: I will not rebel was taken at all times by all aspirants