वंदे वीरम, जय महावीरच्या घोषात मिरवणूक

ओसवाल बंधू समाज मंगल कार्यालय, शंकरशेठ रस्ता - ‘सकाळ माध्यम समूहा’च्या ‘आय विल व्होट’ उपक्रमांतर्गत मतदानाची प्रतिज्ञा घेताना जैनधर्मीय.
ओसवाल बंधू समाज मंगल कार्यालय, शंकरशेठ रस्ता - ‘सकाळ माध्यम समूहा’च्या ‘आय विल व्होट’ उपक्रमांतर्गत मतदानाची प्रतिज्ञा घेताना जैनधर्मीय.

पुणे - चांदीच्या, तसेच फुलांच्या रथामध्ये आसनस्थ झालेली भगवान महावीर यांची मूर्ती... वंदे महावीर, जय महावीर आणि नवकार महामंत्राचा घोष, अशा उत्सवी वातावरणात भगवान महावीर यांच्या २६१८ व्या जन्मकल्याणक महोत्सवाच्या निमित्ताने बुधवारी (ता.१६) मिरवणूक काढण्यात आली.

श्री जैन सामुदायिक उत्सव समितीच्या वतीने या मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. गुरुवार पेठेतील श्री गोडीजी पार्श्‍वनाथ मंदिर येथून मिरवणुकीला प्रारंभ झाला. नेहरू चौक, सिटी पोस्ट, लक्ष्मी रस्ता मार्गे शंकरशेठ रस्त्यावरील ओसवाल बंधू समाज मंगल कार्यालय येथे मिरवणुकीचे रूपांतर सभेमध्ये झाले. 

भगवान महावीर यांनी अहिंसा, सत्य, अपरिग्रह, भूतदया, मानवता या संदर्भात दिलेल्या संदेशाचे आकर्षक फलक लक्ष वेधून घेत होते. याशिवाय, युवक, युवतींनी पथनाट्य, तसेच नाटिकाही सादर केल्या. जैन सोशल ग्रुप, शंखेश्‍वर पूनम यात्रा संघ, पद्मावती महिला मंडळ, श्री गोडीजी वर्धमान ग्रुप, सराफ मित्र मंडळ, सादडी बहू मंडळ, तुळशीबाग मंडई जैन संघ, तेरापंथ युवक परिषद, अरिहंत ग्रुप, जय आनंद ग्रुप, शांतिनाथ दिगंबर मंडळ, सौम्य संस्कार महिला मंडल, वीतराग सेवा संघ, जैन अलर्ट ग्रुप,  अशा विविध मंडळांनी आकर्षक देखावे सादर केले होते. याशिवाय, विविध संस्था, संघटनांनी अन्नदान, रक्‍तदान शिबिर, आरोग्य शिबिर यांचे आयोजन करण्यात आले होते.  

सोन्या मारुती चौकात पुणेकरांच्या वतीने मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले. या वेळी, मोहन जोशी, अभय छाजेड, राजेश येनपुरे, हेमंत रासने, कमल व्यवहारे, प्रवीण चोरबेले, सुहास कुलकर्णी आदी उपस्थित होते. अचल जैन, भरत शहा, विजय भंडारी, राजेश साकला आदींनी नियोजन केले.

पालकमंत्री गिरीश बापट, आमदार माधुरी मिसाळ यांनी रामोशी गेट येथे रथाचे दर्शन घेतले. ओसवाल बंधू समाज येथे सामूहिक वंदना देण्यात आली. या वेळी उल्हास पवार, आमदार शरद रणपिसे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संपत जैन, शरद शहा, अनिल गेलडा, सतीश शहा, जयकुमार कासलीवाल, पुष्पा कटारिया, संजय ओसवाल, गिरीष सोलंकी आदींनी प्रयत्न केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com