मतदान वाढविण्यासाठी आदर्श मतदान केंद्रे - राव

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 जानेवारी 2017

पुणे - मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रत्येक मतदारसंघातील किमान दहा मतदान केंद्रे ही आदर्श केंद्रे बनविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिली. 

पुणे - मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रत्येक मतदारसंघातील किमान दहा मतदान केंद्रे ही आदर्श केंद्रे बनविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिली. 

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नियोजनबद्ध आणि चोख काम करावे, अशा सूचना राव यांनी दिल्या. त्यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आणि समन्वय अधिकारी यांची बैठक झाली. या वेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे, जिल्हा परिषद व पंचायत समिती समन्वय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण उपस्थित होते.
विविध माध्यमांचा वापर करून मतदानाची टक्केवारी वाढविण्यावर भर द्यावा, अशा सूचना राव यांनी दिल्या. त्यासाठी प्रत्येक मतदारसंघातील किमान दहा मतदान केंद्रे आदर्श करण्यात येणार आहेत. या ठिकाणी मतदाराला आवश्‍यक सर्व माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले. 

राव यांनी मतदार यादी, मतदान केंद्रासाठी नियुक्त करण्यात येणारे कर्मचारी, मतदान केंद्र तपासणी, मतदार जनजागृती प्रभावीपणे करण्यासाठीच्या नियोजनाचा तालुकानिहाय आढावा घेतला. विविध माध्यमांचा वापर करून मतदानाचे प्रमाण वाढविण्यास सांगितले.

आचारसंहितेच्या अनुषंगाने बॅनर्स, पोस्टर्स, भित्तिपत्रके तत्काळ काढावीत. मतदान यंत्रांची प्राथमिक तपासणी तसेच मतदान केंद्रांची तपासणी करून त्याचा अहवाल निवडणूक शाखेला तत्काळ देण्याच्या सूचना त्यांनी केल्या. 
राव म्हणाले, ‘‘आचारसंहिता भंगांच्या प्रकरणांवर लक्ष ठेवण्यासाठी विविध भरारी पथके तैनात ठेवावीत. आचारसंहिताप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करावा. विविध कार्यक्रम, सभा आदी संबंधी विविध राजकीय पक्षांना देण्यात येणाऱ्या परवानग्यांबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्वरित निर्णय घेऊन तो संबंधितांना कळवावा. पेड न्यूजमध्ये मोडणाऱ्या बातम्या प्रसिद्ध होत असल्याचे दिसून आल्यास संबंधित समितीला तत्काळ कळवावे.’’ 

Web Title: Ideal polling stations to vote to increase