पाठपुरावा झाल्यास निगडीपर्यंत मेट्रोला मंजुरी - शशिकांत लिमये

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 मार्च 2017

वाल्हेकरवाडी - ‘‘पुणे मेट्रो प्रकल्प हा स्वारगेट ते पिंपरी आणि रामवाडी ते हिंजवडी असा आहे. मात्र, प्रकल्पाच्या मूळ मसुद्यात स्वारगेट ते निगडी असाच उल्लेख होता. नागरिकांनी मागणी करून पाठपुरावा केल्यास त्याला मंजुरी मिळू शकते,’’ असा विश्‍वास शशिकांत लिमये यांनी व्यक्त केला.

वाल्हेकरवाडी - ‘‘पुणे मेट्रो प्रकल्प हा स्वारगेट ते पिंपरी आणि रामवाडी ते हिंजवडी असा आहे. मात्र, प्रकल्पाच्या मूळ मसुद्यात स्वारगेट ते निगडी असाच उल्लेख होता. नागरिकांनी मागणी करून पाठपुरावा केल्यास त्याला मंजुरी मिळू शकते,’’ असा विश्‍वास शशिकांत लिमये यांनी व्यक्त केला.

ताथवडेतील जेएसपीएम महाविद्यालय व ‘सकाळ यिन’ यांच्यातर्फे आयोजित इनोव्हिजन तंत्रज्ञान महोत्सवाच्या उद्‌घाटनप्रसंगी लिमये बोलत होते. खडकवासला येथील सेन्ट्रल वॉटर ॲण्ड पॉवर रिसर्च सोसायटीचे संचालक डॉ. एम. के. सिन्हा, डॉ. पी. पी. विटकर, प्राचार्य आर. के. जैन, ‘सकाळ’चे मिलिंद भुजबळ, रामनाथ भट्ट, विनायक त्रिवेदी, अनिर्बन सरकार, दीपक साळुंखे, सुधीर भिलारे, रवी सावंत, उपप्राचार्य ए. एस. देवस्थळी उपस्थित होते. 

लिमये म्हणाले, ‘‘विद्यार्थी हा समाजाचा आरसा असतो, त्याने नवनवीन कल्पना राबवून प्रयोगात नावीन्यता आणली पाहिजे. तांत्रिक व्यवस्थापनाचे कौशल्य आत्मसात करावे. आव्हाने स्वीकारून ती पूर्ण करण्यावर भर दिला पाहिजे. तुम्ही सुरवात करा, प्रेरणा आपोआप मिळेल.’’ अनिर्बन सरकार यांनी ‘पाणी वाचवा’ची प्रतिज्ञा वदवून घेतली. 

सिन्हा म्हणाले, ‘‘विज्ञान हे जागतिक स्तरावर सारखेच आहे; पण तंत्रज्ञान बदलत्या स्वरूपाचे आहे. आपल्या देशात पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. या आव्हानाचा सामना आपण नवनिर्मितीतून करू शकतो. यासाठी विद्यार्थ्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा शोध लावावा, जेणेकरून पाणीटंचाईवर मात करता येईल.’’ प्राचार्य आर. के. जैन यांनी प्रास्ताविक केले. प्रियांका सिंग यांनी आभार मानले. 

या उपक्रमामुळे स्वतःचे कलागुण दाखविण्यासाठी व्यासपीठ मिळाले. महाविद्यालय व ‘सकाळ यिन’ यामुळे आम्हाला ही संधी मिळाली.
- कैलास राऊत, विद्यार्थी

विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन आणि त्यांच्या कलागुणांना वाव या कार्यक्रमातून मिळतो. मुलांना पुस्तकी ज्ञानापेक्षा तांत्रिक ज्ञान यामधून खूप मिळते.
- दामिनी पवार, विद्यार्थिनी

Web Title: If approved to nigadi Metro pursue