बॅंकांनी ठरविले तर रांगा कमी होतील 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016

पुणे  - बॅंकांनी ठरविले तर एटीएम केंद्रांबाहेर लागणाऱ्या रांगा एका दिवसात कमी होऊ शकतात, असा विश्‍वास या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. नव्या नोटांच्या आकारानुसार एटीएम केंद्रातील उपकरणांची अंतर्गत पुनर्रचना (रिकॅलिब्रेशन) तातडीने न करताही शंभर रुपये मूल्याच्या नोटांचे प्रमाण सध्याच्या यंत्रणेत वाढवून नागरिकांचा त्रास कमी होऊ शकतो. 

पुणे  - बॅंकांनी ठरविले तर एटीएम केंद्रांबाहेर लागणाऱ्या रांगा एका दिवसात कमी होऊ शकतात, असा विश्‍वास या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. नव्या नोटांच्या आकारानुसार एटीएम केंद्रातील उपकरणांची अंतर्गत पुनर्रचना (रिकॅलिब्रेशन) तातडीने न करताही शंभर रुपये मूल्याच्या नोटांचे प्रमाण सध्याच्या यंत्रणेत वाढवून नागरिकांचा त्रास कमी होऊ शकतो. 

कोणत्याही एटीएम उपकरणाचे दोन किंवा चार "कॅसेट्‌स' असतात. त्या प्रत्येक "कॅसेट'मध्ये एक हजार ते अडीच हजार नोटा बसविलेल्या असतात. त्या नोटा पाचशे किंवा शंभर रुपये मूल्याच्या असतात. आपण जेव्हा उपकरणामध्ये कार्ड घालून पैसे काढण्याची मागणी करतो तेव्हा एटीएम उपकरणातून "सर्व्हर'ला सूचना पाठविली जाते. आपल्या खात्यात असलेली शिल्लक रक्कम आणि बॅंकांनी पूर्वनिर्धारित केल्याप्रमाणे आपल्यासाठी पाचशे किंवा शंभरच्या नोटा उपकरणातून बाहेर येतात. 

उदाहरणार्थ चार कॅसेट असलेले एटीएम उपकरण असेल आणि बॅंकेने पूर्वनिर्धारित केल्याप्रमाणे तीन कॅसेट्‌समध्ये पाचशे रुपये मूल्याच्या एक हजार नोटा आणि एका कॅसेटमध्ये शंभर रुपये मूल्याच्या एक हजार नोटा आहेत. सध्याच्या परिस्थितीत पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या असल्यामुळे एटीएम उपकरणातील तीन कॅसेट्‌स निरुपयोगी ठरत आहेत. उर्वरित एका कॅसेटमधून शंभर रुपये मूल्याच्या जास्तीत जास्त एक हजार नोटा म्हणजे एक लाख रुपयेच निघू शकतात. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला किंवा कार्डधारकाला दोन हजार रुपयांची मर्यादा असल्याचे गृहीत धरल्यास फक्त 50 व्यक्ती रक्कम काढू शकतात. याच कारणास्तव सध्या एटीएममध्ये नोटा भरणा केल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासातच ते केंद्र "आउट ऑफ कॅश' होत आहे. 

उद्यम बॅंकेचे संचालक आणि "इन्वासिस्टिम्स' कंपनीचे डिलिव्हरी हेड निरंजन फडके म्हणाले, ""एटीएम रिकॅलिब्रेट न करताही कॅसेटमध्ये काही प्रमाणात बदल करून शंभर रुपये मूल्याच्या नोटांची भरणा वाढवता येईल. त्यामुळे पाचशे रुपये मूल्याच्या नोटांसाठी असलेल्या व सध्या निरुपयोगी ठरलेल्या कॅसेट्‌स पुन्हा कार्यान्वित होतील आणि अधिकाधिक नागरिकांना पैसे काढता येतील. या सर्व प्रक्रियेसाठी काही मिनिटांचा वेळ लागतो. त्यामुळे बॅंकांनी यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.'' 

नागरिकांना दिलासा द्या 
""नव्या नोटांसाठी एटीएम केंद्रातील उपकरणांच्या रिकॅलिब्रेशन प्रक्रियेला वेळ लागू शकतो. त्यामुळे ती प्रक्रिया जेव्हा करायची तेव्हा बॅंका करू शकतात; पण तोपर्यंत नागरिकांना दिलासा देण्यासाठी शंभर रुपये मूल्याच्या नोटांचे प्रमाण वाढविणेच योग्य ठरेल,'' असे निरंजन फडके यांनी सांगितले. 

Web Title: If banks can decide to be less queues outside ATM Centres

टॅग्स