
Narayan Rane : उद्योजकाकडे संशायाने पाहिले तर गुंतवणूक कशी येईल; नारायण राणे
पुणे : “उद्योजक नोकऱ्या देतात, अर्थव्यवस्थेला मदत करतात. प्रत्येक उद्योजकाकडे संशयाने पाहिल्यास देशात गुंतवणूक कशी येईल, असा प्रश्न उपस्थित करत उद्योजक गौतम अदानी प्रकरणार केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी भाष्य केले.
भाजपच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्यातर्फे आयोजित पुणे शॉपिंग फेस्टिव्हलचे उद्घाटन नारायण राणे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
राणे म्हणाले, प्रत्येक उद्योजकाकडे वेगळ्या नजरेने पाहिल्यास परदेशातून भारतात उद्योजक येणार नाहीत. सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योजकांना कर्ज मिळण्यात अडचणी येत असल्यास त्या सोडविण्यासाठी माझ्या विभागाकडून बँकांना सूचना दिल्या जातील. ज्या उद्योजकांना कर्जासाठी अडचणी येत आहेत, त्यांनी त्रुटी दूर करून नव्याने अर्ज करावा.
रत्नागिरी येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांना कधीच भेटलो नाही, त्यांच्याशी माझा संबंध नसून, त्यांचा मृत्यू झाल्याच्या घटनेशी देखील माझा संबंध नाही. याप्रकरणात पोलिस चौकशी करत असून, सत्य बाहेर येईल. केंद्र आणि राज्य सरकारने केलेल्या कामांचे लोकार्पण करण्यासाठी पंतप्रधान मोदी मुंबईत आले होते. आम्ही केलेल्या कामांचे लोकार्पण आम्हीच करणार, दुसरे कोण करणार? मोदी यांचा मुंबई दौरा आणि निवडणुका यांचा संबंध नाही, असे राणे यांनी सांगितले.
दरम्यान, कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन करताना राणे म्हणाले, ‘‘नरेंद्र मोदी यायच्या आधी आपली अर्थव्यवस्था जगात १०व्या क्रमांकावर होती. आता ५व्या क्रमांकावर आली असून, मोदी तिसऱ्या क्रमांकावर नेण्याचा प्रयत्न करत आहेत. व्यवसाय करणे गैर नाही. मी शिक्षण घेत असल्यापासून व्यवसाय करतो.
गोव्यात व इतर ठिकाणी तारांकित हॉटेल आहेत. आपला खिसा भरलेला असताना दुसऱ्याच्या खिशात हात घालायची गरज पडत नाही. देशाचा जीडीपी वाढविणे तुमच्या हातात आहे, सुक्ष्म व लघु उद्योगांसाठी गुजरात, हरियाना, उत्तर प्रदेशातून जास्त अर्ज येत आहेत, असे राणे यांनी सांगितले.
धनुष्यबाण शिंदेनाच मिळणार
शिवसेनेच्या चिन्हासंदर्भात न्यायालयाचा निकाल काय येईल त्यावर मी भाष्य करत नाही. मात्र, धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे यांनाच मिळेल असे ज्योतिष म्हणून सांगतो. कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीत या दोन्ही जागा मोठ्या मताधिक्याने भाजप जिंकेल. विरोधकांचा सुपडासाफ होईल. भाजप हा ग्रामपंचायत ते संसदेपर्यंत सर्व प्रकारच्या निवडणुका गांभीर्याने घेऊन लढवतो, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे देखील पुण्यात येत आहेत, असे राणे यांनी सांगितले.