सत्ता आल्यास शहर आंतरराष्ट्रीय दर्जाचे बनवू - देवेंद्र फडणवीस

सत्ता आल्यास शहर आंतरराष्ट्रीय दर्जाचे बनवू - देवेंद्र फडणवीस

पुणे - 'जगभरातील उद्योगधंद्यांचा पुण्याकडे ओढा आहे. परंतु, गेल्या 10-15 वर्षांत भक्कम पायाभूत सुविधा उभारलेल्या नाहीत. पुण्याकडे केवळ "सोन्याची अंडी देणारी कोंबडी' एवढ्याच उद्देशाने म्हणून पाहिले गेले,'' अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या
कारभारावर टीकास्त्र सोडले. महापालिकेत सत्ता आल्यास पुणे शहर आंतरराष्ट्रीय दर्जाचे करू, असे आश्‍वासन देत, मुख्यमंत्र्यांनी आगामी निवडणुकीच्या प्रचाराचा नारळही यानिमित्ताने फोडला.

महापालिकेतील भारतीय जनता पक्षाचे गटनेते गणेश बिडकर यांच्या प्रयत्नातून केलेल्या जीर्णोद्धारानंतर नागेश्वर मंदिराचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाला. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. महापौर प्रशांत जगताप, पालकमंत्री गिरीश बापट, समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे,

खासदार अनिल शिरोळे, आमदार माधुरी मिसाळ, पक्षाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले आदी या वेळी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, 'शहर गजबजलेले आहे. वाहतूक कोंडी नित्याचीच आहे. त्यामुळे पुणेकरांचे हाल होत आहेत. झोपडपट्ट्या वाढत आहेत. अशा परिस्थितीत शहराचे नियोजन करायला हवे. दुर्दैवाने ते होत नाही. नियोजनाकरिता "पीएमआरडीए' वेळेत करण्याऐवजी त्याच्या मलिद्यावरून राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसमध्ये वाद झाला. त्यामुळे "पीएमआरडीए' रखडली होती. परंतु, आमचे सरकार आल्यानंतर ती स्थापन करून विकासाचे नियोजन करण्यात आले. शहराच्या विकास आराखड्याची (डीपी) मुदत आणखी वर्षभर आहे. मात्र, त्याला लवकरच मंजुरी देऊ. सार्वजनिक वाहतूक सक्षम व्हावी, यासाठी मेट्रोचे जाळे उभारण्यात येईल.'' प्रामाणिकपणे काम करीत आहोत. त्याच भावनेने पुण्याचा विकास करू, असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री म्हणाले,
- नव्या विमानतळामुळे शहरातील रोजगारात दुपटीने वाढ
- विमानतळावर उभारणार कार्गो सेवा
- केंद्र सरकारच्या योजनेतून शहरातील गरिबांना 2019 पर्यंत घरे
- गरिबांच्या घरांच्या प्रस्तावाला तातडीने मंजुरी देणार
- जायका प्रकल्प वेगाने पूर्ण करणार
- "पीएमआरडीए'च्या शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोला लवकर मंजुरी देणार

कर्णे गुरुजी यांचा भाजपमध्ये प्रवेश
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक बापूसाहेब कर्णे गुरुजी यांच्यासह अन्य पक्षांतील कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. कर्णे गुरुजी यांनी पदाचा आणि पक्षाचा रीतसर राजीनामा देऊनच भाजपमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे माजी आमदार कुमार गोसावी यांचे पुतणे किशोर गोसावी, गौरव घुले, संध्या नांदे, महेश वाबळे, आनंद रिठे, अक्षय शितोळे, रमेश धोणे, संजय कडू, संतोष जैन, राहुल चिकणे, दर्शन गोरे यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.

कात्रज/कोंढवा - 'जगभरात पुणे शहराची एक वेगळी ओळख आहे. या शहरात मोठी क्षमता आहे. ते कधीही मागे राहू शकत नाही. मात्र, महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी शहराच्या विकासाकडे कधीच लक्ष दिले नाही. परंतु, आता सर्वांगीण विकास साधण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार प्रयत्न करीत आहे. त्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेतला आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. आमदार योगेश टिळेकर यांच्या पुढाकारातून कोंढवा बुद्रुक येथील विविध विकासकामांचे उद्‌घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com