मराठवाडा बोगद्याचे काम न थांबविल्यास शेतकऱ्यांचा जनआंदोलनाचा इशारा

1Ujani_Dam_6.jpg
1Ujani_Dam_6.jpg

इंदापूर : उजनी धरणाची पुर्ण पाणी संचय पातळी ४९६.८२ मीटर असून पाणी साठवण क्षमता ११६.२३ टीएमसी आहे. धरण मुळ प्रकल्प अहवालात नियोजीत सिंचन क्षेत्र मुख्य कालव्याची सुरवातीची तळपातळी ४८७.२० मीटर, भिमा सिना जोड कालवा बोगदयाची ४८८.२०, सिना माढा उपसा सिंचन योजनेची तळ पातळी ४९१.०३ तर धरणाची पाणी वापराची कमीतकमी पातळी ( एमडीडीएल ) ४९१.०३ मीटर आहे. त्यामुळे मराठवाडा बोगद्याचे काम झाल्यानंतर धरणातील मृतसाठ्यातील पाणी देखील जाणार असल्याने धरणाचे पाणी नियोजन कोलमडून जाणार आहे. त्यामुळे धरणासाठी त्याग केलेल्या इंदापूर, करमाळा, माढा, कर्जत, राशीनच्या शेतकऱ्यांच्या हक्कावर गदा येणार आहे. त्यामुळे ४९२ मीटर सुरवातीची तळपातळी ठेवूनच हा प्रकल्प व्हावा अशी मागणी उजनी धरणग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष अरविंद जगताप यांनी 
केली.

निरा भिमा स्थिरीकरण अंतर्गत निरा खोऱ्यातून उजनी जलाशयाच्या माध्यमातून मराठवाड्यास पाणी देण्याचे नियोजन असून यासाठी निरा ते उजनी व उजनी जलाशय ते सिना कोळगाव धरण ( ता. परांडा ) पर्यंत कालव्याचे काम चालू आहे. कालव्यातून मराठवाडयास देण्यात येणारे पाणी फक्त पावसाळ्यात उजनी जलाशयात येवून लगेच पुढे मराठवाड्याकडे जाणार आहे. हे पाणी धरण ३० टक्के भरल्यानंतर म्हणजेच जलाशयाची पातळी ४९३ मीटर झाल्यानंतरच प्रवाही होणार आहे. मात्र या कालव्याची पातळी ४८७ मीटर इतकी घेतली आहे. म्हणजेच धरणातील मुख्य कालव्याच्या तळपातळीपेक्षा ही पातळी सहा मीटरने खाली आहे. वास्तविक  जलशास्त्राप्रमाणे ४९३ मीटरच्या वरील पाणी पुढे जाण्यासाठी ४९२ सुरवातीची तळपातळी पुरेशी आहे. मात्र ही पातळी ४८७ घेतल्यामुळे धरणातील जिवंत व मृत साठ्यातील पाणी मराठवाड्याकडे जाणार आहे. त्यामुळे पुणे, सोलापूर व नगर जिल्ह्यास पाणी कमी पडणार असून पाणी नियोजन कोलमडून कोट्यावधी 
रूपयांचे नुकसान होणार आहे. त्याचा थेट फटका ६० साखर कारखाने, १० औद्योगिक वसाहती तसेच हजारो उपसा जल सिंचन योजनांना बसून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होणार आहे. तसेच ज्यादा खोलीवरून कालवा खोदल्यामुळे शासनाचे देखील अब्जावधी रूपये वाया जाणार आहे.

सध्यस्थितीस धरणातील पाणी वापर संकल्पनेप्रमाणे अक्कलकोट, मंगळवेढा या कालव्याच्या शेवटच्या भागात अद्यापही पोहोचले नाही. त्यातच नव्याने नऊ उपसा सिंचन योजना नियोजनात समाविष्ट केल्या असून त्या अपुर्ण आहेत. त्यामुळे उजनीच्या पाणी नियोजनाचा खेळखंडोबा होणार असून धरणावरील नवीन नियोजनात नसलेल्या बोगद्याची सुरवातीची तळपातळी ४८७ ऐवजी ४९२ रहाणे गरजेचे आहे. अन्यथा बेसुमार पाणी वापर होवून मुळ सिंचनास देखील पाणी मिळणार नाही. त्यामुळे धरण उशाशी मात्र कोरड घश्याशी अशी शेतकऱ्यांची अवस्था होणार आहे. सध्या मराठवाडा बोगद्याचे २९ किलोमीटर काम होणार असून सदर काम ताबडतोब थांबविणे गरजेचे आहे. सदर काम न थांबविल्यास धरणावर अवलंबून असलेल्या ६ तालुक्यातील उपसा सिंचन योजना तसेच कालव्यावरील शेतकरी जनआंदोलन उभा करतील असा इशारा त्यांनी शेवटी दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com