चुकीचे काम होत असेल तर विरोधकांची भूमिका मांडत चला- शरद पवार 

दीपेश सुराणा
मंगळवार, 19 जून 2018

पिंपरी - "शहरामध्ये विकासकामे व्हायला हवी. त्यामध्ये आडवे जाऊ नका. मात्र, महापालिकेतील सत्ताधारी भाजपकडून चुकीचे काम होत असेल तर विरोधकाची भूमिका मांडत चला'', असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी पुणे येथे मांडले.महापालिकेत विरोधी पक्षनेते पद स्वीकारल्यानंतर दत्ता साने यांच्यासह शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने पवार यांची पुणे येथील मोदीबाग येथे जाऊन सदिच्छा भेट घेतली. 

माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, नगरसेवक अजित गव्हाणे, नाना काटे, प्रवीण भालेकर, पंकज भालेकर, स्वीकृत सदस्य भाऊसाहेब भोईर तसेच धनंजय भालेकर आदी उपस्थित होते. पवार यांच्या समवेत शहर राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने शहरातील विविध प्रश्‍नांबाबत साधकबाधक चर्चा केली. 

महापालिकेतील सत्ताधारी भाजपने कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्पासाठी 21 वर्षांची निविदा दिली असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली. "हा प्रकार कोणाला डोळ्यासमोर ठेवून होत आहे. याबाबत विरोधाची भूमिका घेतली नाही का?,'' अशी विचारणा पवार यांनी केली. 

"पवना धरणातून थेट जलवाहिनीने शहरासाठी पाणी उचलण्याच्या प्रकल्पाचे काय झाले? आंद्रा व भामा आसखेड धरणातून शहरासाठी पाणी आणण्याचे काम कोठपर्यंत आले आहे. हे प्रकल्प नागरिकांसाठी महत्त्वाचे आहे. केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता असताना त्याला विलंब का होत आहे? शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत पाठपुरावा करायला हवा'', असे पवार यांनी स्पष्ट केले. 

हिंजवडीतील वाहतूक समस्येचे काय? 
"हिंजवडी आयटी पार्क परिसरात सध्या वाहतुकीची समस्या जाणवत आहे. संबंधित परिसरातील रस्ते मोठे झाले तर हा प्रश्‍न सुटू शकेल. त्याशिवाय, वाकड आणि म्हाळुंगे यांना जोडणाऱ्या उड्डाणपुलाच्या कामाची काय स्थिती आहे? येथील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी योग्य नियोजन व्हायला हवे'', असेही मत शरद पवार यांनी व्यक्त केले. 

Web Title: If wrong work is done then let's stand the role of opponents - Sharad Pawar