‘आयआयटी’, ‘आयआयएम’ची क्षमता वाढली

Education
Education

पुणे - खुल्या गटातील दहा टक्के आरक्षणामुळे देशातील केंद्रीय शिक्षण संस्थांमधील प्रवेश क्षमता २५ टक्‍क्‍यांनी वाढली आहे. मूळच्या जागांना कोणताही धक्का न लावता खुल्या गटाला आरक्षण दिल्याने क्षमतेत ही वाढ झाली आहे. या निर्णयामुळे ‘आयआयटी’,‘एनआयटी’ व ‘आयआयएम’मधील प्रवेश क्षमता १५ हजारांनी वाढेल, तर इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठासह देशातील इतर केंद्रीय संस्थांमध्ये तब्बल दोन लाख १५ हजार ४६० जागांची वाढ होणार आहे. 

यातील निम्म्या जागा येत्या शैक्षणिक वर्षात, तर उर्वरित जागा पुढच्या शैक्षणिक वर्षात वाढविण्यात येणार आहेत. केंद्राच्या अखत्यारीत येणाऱ्या संस्थांमध्ये प्रवेश क्षमता वाढणार असल्याने ‘आयआयटी’मधील प्रवेश क्षमता ६७०८, ‘एनआयटी’मधील ७२५६, तसेच ‘आयआयएम’मधील प्रवेश क्षमता १३६३ ने वाढणार आहे. या निर्णयामुळे केंद्र सरकारच्या तिजोरीवर पाच हजार ६७६ कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. या संदर्भात केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी संपर्क साधला असता. येत्या शैक्षणिक वर्षापासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार असून, देशाच्या उच्च शिक्षणक्षेत्रातील हा एक मोठा निर्णय असल्याचे जावडेकर यांनी सांगितले.  

प्रवेश क्षमतेत वाढ करण्याचा निर्णय विद्यार्थीकेंद्रित आहे. खुल्या गटातील आरक्षणामुळे थेट २५ टक्के जागा वाढणार असल्याने या गटातील विद्यार्थ्यांना अधिकची संधी मिळणार आहे. त्यामुळे राज्यातून खुल्या गटातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण संस्थांमध्ये प्रवेशाचा मार्ग सुकर झाला आहे. 
- प्रगती निशिकांत कडबाने, विद्यार्थिनी, बारावी सायन्स

या निर्णयामुळे मूळच्या आरक्षणातील एकाही जागेला हात न लावता उलट प्रवेश क्षमतेत तब्बल २५ टक्के वाढ करण्यात आली आहे. यामुळे ‘आयआयटी’ व ‘आयआयएम’सारख्या संस्थांमध्ये देशभरातील विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या संधी आणखी वाढल्या आहेत. 
 - प्रकाश जावडेकर, मनुष्यबळ विकासमंत्री

आरक्षणाला बाधा नाही
खुल्या गटातील आरक्षणात दहा टक्के वाढ करण्यात आली असली तरी जागांमध्ये २५ टक्के वाढ करण्यात आली आहे. आधीपासून लागू असलेल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गासाठी असलेल्या आरक्षणांना कोणतीही बाधा पोचू नये, यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे, असे जावडेकर यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com