हवेच्या प्रदूषणाची मिळणार पूर्वसूचना 

सम्राट कदम
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

प्रदूषणाच्या वाढत्या पातळीची पूर्वसूचना देणारी यंत्रणा पुण्यातील भारतीय उष्णकटिबंधीय हवामान संशोधन संस्थेने (आयआयटीएम) विकसित केली आहे. राजधानी दिल्लीसह चार शहरात ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. 

पुणे : वाढत्या हवा प्रदूषणामुळे राजधानी दिल्लीचा श्‍वास गुदमरला आहे. प्रदूषणाच्या वाढत्या पातळीमुळे नागरिकांच्या आरोग्याबरोबरच प्राण्यांच्या जीविताचा प्रश्‍नही ऐरणीवर आला आहे. प्रदूषणाच्या वाढत्या पातळीची पूर्वसूचना देणारी यंत्रणा पुण्यातील भारतीय उष्णकटिबंधीय हवामान संशोधन संस्थेने (आयआयटीएम) विकसित केली आहे. राजधानी दिल्लीसह चार शहरात ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. 

भारतीय हवामान विभाग, अमेरिकेतील हवामान संशोधन संस्थेच्या सहकार्याने "आयआयटीएम'चे शास्त्रज्ञ डॉ. सचिन घुडे यांच्या नेतृत्वाखाली ही यंत्रणा विकसित करण्यात आली आहे. प्रदूषणाची वाढत्या पातळीचे योग्य विश्‍लेषण या यंत्रणेतून दिल्ली सरकारला मिळणार आहे. यासाठी दिल्लीत 43 नियंत्रण कक्षांची स्थापना करण्यात आली आहे. हवेतील रासायनिक प्रदूषक, चारशे मीटर भागातील हवेचे अचूक पृथक्करण, तीन किलोमीटरपर्यंतच्या हवेचा दर्जा याची माहिती याद्वारे मिळेल.

पूर्वसूचना देण्यासाठी अवकाशातील उपग्रहांचा आणि जमिनीवरील नियंत्रण कक्षाचा वापर करण्यात आला आहे. दिल्लीतील हवेचा दर्जा, वहनाची दिशा, वेग, प्रदूषके यासंबंधीची माहिती https://ews.tropmet.res.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इतर शहरांत दहा किलोमीटरपर्यंतच्या हवेतील प्रदूषणाची पूर्वसूचना या यंत्रणेच्या माध्यमातून मिळेल. 

यंत्रणेची वैशिष्ट्ये 
- हवेतील प्रदूषकांची पातळी आणि दृश्‍यता यांची प्रत्यक्ष माहिती 
- नेमक्‍या कोणत्या कारणामुळे प्रदूषण याची माहिती उपग्रहाद्वारे मिळणार. 
- पूर्वसूचना देणारे संदेश, तसेच आवश्‍यक खबरदारीचे उपाय सुचविले जाणार 
- आजूबाजूच्या शहरांतील हवेतील प्रदूषणाची माहिती देणार 
- थंडीमध्ये पडणाऱ्या धुक्‍याची पूर्वसूचना मिळणार 

 

दिल्लीसह लखनऊ, वाराणसी, कोलकाता आदी शहरांमध्ये ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. दिल्लीमध्ये चारशे मीटर भागातील हवेतील प्रदूषकांची सखोल व सविस्तर माहिती या यंत्रणेद्वारे मिळेल. 
- डॉ. सचिन घुडे,
शास्त्रज्ञ 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: iitm will predict air pollution level in delhi