अनधिकृत बांधकामे जोमात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 मार्च 2017

पिंपरी - ‘अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करा,’ असा आदेश नगरविकास विभागाने राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका आणि नियोजित प्राधिकरणांना नुकताच दिला आहे, असे असतानाही पिंपरी-चिंचवड शहरात बेकायदा बांधकामांचा सुळसुळाट झाला आहे.

पिंपरी - ‘अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करा,’ असा आदेश नगरविकास विभागाने राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका आणि नियोजित प्राधिकरणांना नुकताच दिला आहे, असे असतानाही पिंपरी-चिंचवड शहरात बेकायदा बांधकामांचा सुळसुळाट झाला आहे.

शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच सत्तेवर आलेल्या भाजपकडे सर्वांचे डोळे लागले असताना नवनिर्वाचित महापौरांच्या प्रभागातही अनधिकृत बांधकामे वेगाने सुरू असून, महापालिकेतील समाविष्ट गावांमध्येही बेकायदा बांधकामांचे पेव फुटल्याने बजबजपुरी झाली आहे.  भोसरी-आळंदी रस्त्यालगत असलेल्या वडमुखवाडी परिसरातील साईनगर, लक्ष्मीनारायणनगर, मोशी गावठाण, दिघी गावठाणात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे झाली आहेत, त्यामुळे परिसराच्या विकासाला खीळ बसली असून, पाणीटंचाई, रस्ते विकास व साफसफाईचा अभाव आदी समस्या या भागात आहेत. 

साईनगर आणि लक्ष्मीनारायणनगर परिसरात बेकायदा बांधकामांची मोठी समस्या आहे. इंचभरही जागा न सोडता दाटीवाटीने झालेल्या बांधकामांमुळे परिसर गजबजला आहे. अर्धा गुंठा जागेवरही आडव्यातिडव्या बहुमजली इमारती उभारल्या आहेत. वाढीव बांधकामांचे प्रमाणही मोठे असून, ५० टक्‍क्‍यांहून अधिक वाढीव बांधकामे सुरू आहेत. 

या परिसरालगत लष्कराचा विस्तीर्ण भूखंड आहे. डोंगराळ प्रदेशामुळे मोठे भराव घालून बांधकामे केली आहेत, त्यामुळे संपूर्ण परिसरात अनेक तीव्र चढ-उतार आहेत, त्यामुळे या परिसरात रस्त्यांचा प्रश्‍न गंभीर आहे.  दिघी गावठाण आणि मोशी परिसरातही अशाच प्रकारचे चित्र पाहायला मिळते. असेल तेवढ्या जागेवर टोलेजंग बांधकामे उभारली आहेत.

येथील बहुतांश बांधकामे २०१५ पूर्वीची आहेत. त्याचेच नूतनीकरण करण्याचे काम सुरू आहे, त्यामुळे बेकायदा बांधकाम वाढत आहेत, असे म्हणणे चुकीचे ठरेल.
नितीन काळजे, महापौर

निवडणुकीपूर्वी येथील बांधकामांवर अतिक्रमण विरोधी कारवाई केली होती. त्यानंतरही नोटीस बजावण्याचे काम सुरू आहे. नोटीस मिळूनही बांधकामे सुरूच राहिल्यास त्यावर बुलडोझर फिरविण्यात येईल.
प्रशांत पाटील, सह शहर अभियंता, स्थापत्य विभाग

नोकरी, उद्योग-धंद्याच्या निमित्ताने शहरात आलेल्यांनी आपल्या कुवतीनुसार काही वर्षांपूर्वीच येथे अर्धा-एक गुंठा जागा घेतल्या आहेत. महापालिकेच्या क्‍लिष्ट आणि जाचक अटींमुळे इतक्‍या लहान भूखंडावर अधिकृत बांधकाम करणे अशक्‍य आहे, त्यामुळेच बेकायदा बांधकाम करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. अधिकृत बांधकामांना प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेने अटी व शर्ती शिथिल करणे आवश्‍यक आहे. 
विनया तापकीर, स्थानिक नगरसेविका

Web Title: illegal construction in pcmc