Mobile-Tower
Mobile-Tower

पिंपरी-चिंचवड शहरात अनधिकृत टॉवरचे पेव

पिंपरी - शहरातील ६१३ मोबाईल टॉवरपैकी ३५० टॉवर अनधिकृत आहेत. मोबाईल कंपन्यांनी टॉवरची २२ कोटी ४३ लाखांची मिळकतही थकविली असून, महापालिकेच्या एका इमारतीवरच अनधिकृत मोबाईल टॉवर असल्याची माहिती समोर आली आहे.  

अनधिकृत टॉवरमध्ये एरटेल कंपनीचे ६५ टॉवर, आयडिया ५६, रिलायन्स ५५, इंडस ४१, व्होडाफोन ३५, टाटा २४, बीएसएनएल १५ आदी मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे. तसेच याही कंपन्या थकबाकीत अग्रेसर आहेत.

महापालिका क्षेत्रातील लोकसंख्या २५ लाखांच्या घरात गेली आहे. येथील नागरी वस्त्यांमध्ये वाढ होत असल्याने चांगली सेवा पुरवून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मोबाईल कंपन्यांनी शहरांकडे मोर्चा वळवला.

परिणामी शहरातील अनेक मोक्‍याच्या ठिकाणी तसेच मोठ्या इमारतींच्या गच्चीवर टोलेजंग टॉवर उभारण्यात आले आहेत. मात्र, ३५० टॉवरसाठी महापालिकेची कोणत्याही प्रकारची परवानगी मोबाईल कंपन्यांनी घेतलेली नाही. ही बाब वसंत रेंगडे यांना माहितीच्या अधिकारात दिलेल्या उत्तरात समोर आली आहे. 

मोबाईल टॉवर उभारताना किरणोत्सर्ग स्तरही तपासावा लागतो. एका ठिकाणी किती टॉवर असावेत, निवासी इमारतीपासून ते किती दूर असावेत, त्याचेही निकष असतात; परंतु कुणीच हे निकष पाळत नसल्याचे दिसून येत आहे. अनेक अनधिकृत इमारतींवरही अनधिकृत टॉवर असून, अशा प्रकारचे टॉवर अधिकृत होणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. काही मोठ्या हाउसिंग सोसायट्यांनीही अनधिकृतपणे टॉवर उभारले आहेत. दोन वर्षापूर्वी असे अनधिकृत टॉवर पालिकेने सील केले होते. मात्र, मोबाईल कंपन्यांनी न्यायालयातून याला स्थगिती आणली होती, असे पालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले. 

संत तुकारामनगर येथील पालिकेच्या मालकीच्या इमारतीवरच अनधिकृत मोबाईल टॉवर उभारला असून, त्याचीही एक लाख ७० हजारांची थकबाकी आहे. या मिळकतधारकाचे नाव आयुक्त व रिलायन्स इन्फो असल्याचे कागदपत्रात म्हटले आहे.

अनधिकृत बांधकामावरील शास्तीकराबाबत सरकारने दिलेल्या सूचनांनुसार इतर बांधकामांप्रमाणेच अनधिकृत मोबाईल टॉवरलाही शास्तीकर लावण्यात आला आहे. मोबाईल टॉवरची थकबाकी वसूल केली जाणार असून, थकबाकी न भरणारे टॉवर जप्त केले जाणार आहेत.
- डॉ. प्रवीण आष्टीकर, सहआयुक्त, महापालिका 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com