बेकायदा प्रशिक्षण बंद करा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 एप्रिल 2019

पैसे घेण्यासाठी ठेकेदारांची माणसे पुढे
काही दिवसांपासून क्रीडा विभागाने कडक भूमिका घेतल्याने जीवरक्षकांनी आता ठेकेदारांच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणवर्गासाठी पुढे केले असून सुरक्षासाधने, कॉस्च्युमच्या भाड्याचे पैसे गोळा करण्यासाठीही या कर्मचाऱ्यांना पुढे केले जात आहे.

पिंपरी - शहरातील काही जलतरण तलावांवर जीवरक्षक ठेकेदारांच्या कर्मचाऱ्यांना हाताशी धरून प्रशिक्षण वर्ग चालवीत असून, जलतरण पोशाख, सुरक्षासाधने भाड्याने देण्याचे प्रकारही सुरू आहेत. ही बाब लक्षात आल्यावर जीवरक्षकांनी हे प्रशिक्षणवर्ग बंद करावेत, तसेच पोहण्याची सुरक्षासाधने तलावाच्या आवाराबाहेर उपलब्ध करून देण्याची तंबी महापालिकेच्या क्रीडा विभागाने दिल्या आहेत.

दरवर्षी उन्हाळ्यात शहरातील पालिकेच्या जलतरण तलावांवर गर्दी वाढत असते. शाळांना सुट्या लागताच अनेक पालक मुलांना पोहण्याच्या वर्गाला घालण्यास उत्सुक असतात. त्याचा गैरफायदा घेत ठिकठिकाणच्या जलतरण तलावांवरील जीवरक्षक स्वतःचे प्रशिक्षण वर्ग सुरू करतात. यंदाही कमी-जास्त प्रमाणात तलावांवर हेच चित्र दिसून येत आहे. वाढत्या गर्दीच्या तुलनेत जीवरक्षकांची संख्या अगोदरच अपुरी आहे. त्यातच जीवरक्षक मूळ कामाऐवजी प्रशिक्षणवर्ग चालविताना दिसतात. त्यामुळे तलावावर दुर्घटना होण्याचे प्रकार घडतात.

मिळालेल्या माहितीनुसार उन्हाळ्यातील महिन्याभरासाठी प्रत्येक प्रशिक्षणार्थीकडून किमान १५०० ते दोन हजार रुपये शुल्क आकारले जाते. पोहणाऱ्या व्यक्तीला जलतरण पोशाख (कॉस्च्युम) घालणे आणि नवशिकाऊंना आवश्‍यक सुरक्षासाधनांचा वापर करणे बंधनकारक आहे.

त्यामुळे या नियमाचादेखील गैरफायदा घेत तलावांवर जीवरक्षक आणि कर्मचारी संगनमताने ‘कॉस्च्युम’ आणि फ्लोटरसारखी सुरक्षासाधने भाड्याने देतात. ट्यूबला २० रुपये, कॉस्च्युमला आणि फ्लोटरला प्रत्येकी १० रुपये भाडे आकारले जाते. सध्या चिंचवड, प्राधिकरण, कासारवाडी, पिंपळे गुरव आदी तलावांवर हे सर्व प्रकार चालू आहेत. 

सहायक आयुक्त (क्रीडा) आशा राऊत म्हणाल्या, ‘‘जीवरक्षकाने प्रशिक्षणवर्ग चालविणे चुकीचे आहे. त्यावर संबंधित जीवरक्षकावर कारवाईदेखील होऊ शकते. तलावावर त्यांच्यावर कॉस्च्युम किंवा सुरक्षासाधने भाड्याने देणेही अपेक्षित नाही. एखाद्या संस्थेला कॉस्च्युम भाड्याने द्यायचे झाल्यास तलावाबाहेर ते देण्यास आमची हरकत नाही.’’

 

Web Title: Illegal Training Swimming Tank