शहरातील हजारो झाडे गायब

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

पुणे - पुणे शहर हिरवेगार राहावे, याकरिता शहरात तब्बल पाऊण लाख झाडे लावण्याचा आदेश राज्य सरकारकडून येताच, सोसायट्या, मोकळ्या जागा आणि टेकड्यांच्या परिसरात महापालिकेने तितकी झाडे लावली.

यानिमित्ताने गल्लीबोळात झालेले वृक्षारोपणही ठळकपणे दाखवून उद्दिष्टांपेक्षा जादा झाडे लावल्याचे सांगत महापालिकेने आपली पाठ थोपटून घेतली. मात्र, वृक्षारोपण आणि पावसाळा संपून अडीच महिने झाले नाहीत, तोवर शेकडो झाडांनी मान टाकली, तर तितकीच झाडे गायब झाल्याचे दिसून आले. 

नेमकी कुठे आणि किती झाडे लावली होती, त्यांची अवस्था काय, त्यांच्या संगोपनासाठी काय यंत्रणा आहे, याचा तपशील महापालिकेच्या जबाबदार वृक्ष प्राधिकरण समितीच्या अधिकाऱ्यांकडे नाही. याबाबतचा अहवाल समितीच्या सदस्यांपासून लपविला जात असल्याचे त्यांच्याशी बोलल्यानंतर स्पष्ट झाले. मुळात, ज्या प्रमाणात झाडे लावल्याचा दावा केला जातो, त्याप्रमाणात जागा मिळाली होती का, अशी शंका आहे. परिणामी, खरोखरीच झाडे लावण्यात आली होती का, याचा शोध घेण्याची वेळ आली आहे.

दरम्यान, जेव्हा वृक्षारोपणाची मोहीम हाती घेतली तेव्हाही ‘सकाळ’ने पाठपुरावा केला होता. मात्र, नगरसेवक आणि अधिकारी झाडांचे आकडे दडवत असल्याचे स्पष्ट झाले होते. 

त्यानंतर झाडांची स्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा हा गोंधळ उघड झाला.

नागरिकांच्या तक्रारी
पर्यावरणाबाबत आस्था असल्याचे दाखवत समितीचे सदस्य आणि नगरसेवकांनी आपापल्या भागातील मोकळ्या जागा, सोसायट्यांमध्ये झाडे लावण्याची मोहीम पावसाळ्यात उघडली. त्याअंतर्गत पाऊण लाख झाडे लावल्याचे महापालिकेने जाहीर केले. त्याचा गाजावाजा करीत अहवालही प्रसिद्ध केला. पर्वती, कोथरूड, मुंढवा, हडपसर, कर्वेनगर, धनकवडी आणि सिंहगड रस्त्यांवरील मोकळ्या जागा आणि काही सोसाट्यांच्या आवारात शेकडो झाडे लावल्याच्या नोंदी दाखविण्यात आल्या. आता या भागांतील ही झाडे जळली असून, बहुतांशी झाडे लावल्यानंतर एक-दोन दिवसांत गायब झाल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या. त्याची दखल घेत प्राधिकरणाच्या सदस्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली, पण समितीचे सचिव गणेश सोनुने यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी माहिती दडविण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले. समितीचे सदस्य सचिन पवार यांनी ही माहिती मागितली होती.

यंदाच्या पावसाळ्यात लावलेली झाडे आणि सद्यःस्थिती याबाबतचा अहवाल मागविला आहे. मात्र, झाडांची काळजी घेण्याकरिता यंत्रणा आहे. त्यावर अधिकाऱ्यांमार्फत देखरेख ठेवली जाते.
- आदित्य माळवे, सदस्य, वृक्ष प्राधिकरण समिती आणि नगरसेवक 

 ज्या भागांत झाडे लावली आहेत, तेथे टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. शिवाय, झाडे सुरक्षित राहावीत, यासाठी झाडांभोवती तारेचे कुंपण केले आहे. त्यामुळे झाडे सुरक्षित आहेत. काही झाडे जळाली असतील; पण बहुतांशी झाडे चांगल्या स्थितीत आहेत.
- गणेश सोनुने, सचिव, वृक्ष प्राधिकरण समिती

Web Title: Illegal Tree Cutting in City