राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 एप्रिल 2017

राज्यात उन्हाचा चटका वाढत आहे. आतापर्यंत देशात पूर्व राजस्थान, गुजरात, तेलंगण, रॉयलसीमा या भागापुरती उष्णतेची लाट मर्यादित होती. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने राज्यातील कमाल तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदला जात असलेल्या विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात उष्णतेची लाट निर्माण होण्याची शक्‍यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

पुणे : विदर्भातील तुरळक ठिकाणी पुढील चोवीस तासांमध्ये उष्णतेची लाट येणार असून, येत्या रविवारपर्यंत (ता. 16) मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातही उष्णतेची लाट पसरेल, असा इशारा हवामान खात्याने शुक्रवारी दिला. पुण्यात या उन्हाळ्यातील उच्चांकी म्हणजे 40.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात सर्वाधिक तापमान वर्धा येथे 45 अंश सेल्सिअस नोंदले गेले. 

राज्यात उन्हाचा चटका वाढत आहे. आतापर्यंत देशात पूर्व राजस्थान, गुजरात, तेलंगण, रॉयलसीमा या भागापुरती उष्णतेची लाट मर्यादित होती. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने राज्यातील कमाल तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदला जात असलेल्या विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात उष्णतेची लाट निर्माण होण्याची शक्‍यता हवामान खात्याने वर्तविली आहे. 

विदर्भात पाऱ्याची उसळी 
विदर्भाच्या काही भागांत पुढील चोवीस तासांमध्ये उष्णतेची लाट निर्माण होईल. सध्या विदर्भातील वेगवेगळ्या शहरांमध्ये 43 ते 45 अंश सेल्सिअसच्या दरम्यान असलेला कमाल तापमानाचा पारा आणखी उसळण्याची शक्‍यता हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आली आहे. विदर्भातील प्रमुख नऊ शहरांपैकी सर्वांत कमी तापमान बुलडाणा येथे 41.2 अंश सेल्सिअस नोंदले गेले. इतर शहरांमधील पारा 43 ते 45 अंश सेल्सिअसपर्यंत वाढला होता. 

मध्य महाराष्ट्रही तापणार 
मध्य महाराष्ट्रातील काही भागांत पुढील दोन दिवसांमध्ये उन्हाचा चटका वाढण्याची शक्‍यता आहे. या भागातील दहापैकी आठ शहरांमधील कमाल तापमानाच्या पाऱ्याने चाळिशी ओलांडली आहे. महाबळेश्‍वर (35.1) आणि कोल्हापूर (38.4 अंश सेल्सिअस) येथील तापमान चाळिशीच्या आत आहे. 

पुण्यात उन्हाळ्यातील उच्चांक 
शहरात यंदाच्या उन्हाळ्यातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली. कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा तीन अंश सेल्सिअसने वाढून 40.6 अंश सेल्सिअस नोंदला गेला, तर लोहगाव येथे 41.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. किमान तापमानात राज्यात सर्वांत कमी म्हणजे 18.8 अंश सेल्सिअस तापमान पुण्यात नोंदले गेले. पुढील दोन दिवस कमाल तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअस दरम्यान राहील. 

का वाढतोय उन्हाचा चटका? 
वायव्य भारतात उन्हाचा चटका वाढला आहे. तेथून येणारे उष्ण व कोरडे वारे महाराष्ट्राच्या दिशेने वाहत आहेत. महाराष्ट्रासह भारताचा बहुतांश भाग या वाऱ्याने व्यापला असून या भागातील उन्हाची तीव्रता वाढत आहे. त्याच वेळी हवेतील बाष्पाचे प्रमाण कमी आहे. त्याचा थेट परिणाम तापमानवाढीवर झाला आहे.

शहर कमाल किमान
पुणे 40.6 (3) 18.8 (-1.1)
लोहगाव 41.7 (3.7) 21.6 (1.6)
जळगाव 43.8 (2.5) 21.0 (-3.1)
कोल्हापूर 38.4 (1.3) 21.7 (0.1)
महाबळेश्‍वर 35.1 (3.4) 21.6 (3)
मालेगाव 43.8 (3.9) 22.6 (1.7)
नाशिक 41 (3.3) 19 (-0.4)
सांगली 40.2 (1.2) 21.5 (0.0)
सातारा 40.6 (3.9) 20.7 (-0.5)
सोलापूर 42.3 (2.3) 21.5 (2.9)
मुंबई 34.2 (2.0) 27 (2.2)
सांताक्रूझ 34.5 (1.9) 24.8 (0.9)
अलिबाग 35.0 (3.4) 24.7 (1.1)
रत्नागिरी 32.6 (0.6) 24.2 (-0.4)
डहाणू 34.2 (1.7) 24.4 (0.7)
उस्मानाबाद 41.9 (3.6)  
औरंगाबाद 41.6 (3.1) 25.4 (3.3)
परभणी 43.5 (3) 22.5 (-1.7)
अकोला 44.5 (3.8) 22.4(-2.2)
अमरावती 43.6 (2.4) 23.6 (-0.7)
बुलडाणा 41.2 (3.9) 27.2 (2.6)
ब्रम्ह्मपुरी 44.2 (3.7) 23.4 (-1.3)
चंद्रपूर 44.8 (3.4) 24.2 (-1.3)
गोंदिया 43 (2.8) 21.2 (-3.5)
नागपूर 44.4 (3.9) 22.7 (-1.5)
वर्धा 45.0 (3.9) 23.5 (-0.6)
यवतमाळ 43.0 (2.7) 24 (-1)

(सर्व आकडे अंश सेल्सिअसमध्ये, कंसात सरासरीपेक्षा वाढ- कमी झालेले तापमान) 

Web Title: IMD warns of Heat wave in Maharashtra