पोलिसांना इशारा, खाकी वर्दीशी बेईमानी करणाऱ्यांची खैर नसणार

police
police

नारायणगाव (पुणे) : कर्तव्यदक्ष म्हणून नावलौकिक असलेले पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी मागील चार महिन्यात खाकी वर्दीशी बेईमानी करणाऱ्या जुन्नर व शिरूर तालुक्यातील चार जणांवर कठोर कारवाई केली आहे. या पैकी दोन जणांना सेवेतून निलंबित केले असून, दोन जणांना बडतर्फ केले आहे. पैशाच्या मोहापायी खाकी वर्दीशी बेईमानी करणाऱ्यांची खैर नाही, असा संदेश या कारवाईतून त्यांनी पोलिस दलातील अधिकारी व कर्मचारी यांना दिला आहे.

पोलिस दलातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वरकमाईच्या अनेक सुरस कथा नेहमीच चर्चेत असतात. अवैध धंद्याकडे दुर्लक्ष करणे, फिर्यादीलाच आरोपीच्या पिंजऱ्यात बसवणे, कारवाई टाळण्यासाठी लाच स्वीकारणे आदी प्रकारे कर्तव्यात कसूर करून  वर्दीशी प्रतारणा केली जाते. कुंपणानेच शेत खाल्ल्यास न्याय कोणाकडे मागायचा, अशी धारणा सर्वसामान्य नागरिकांची काही लाचखोरामुळे झाली आहे. लाचखोरी व खाकीवर्दीशी बेईमानी कराल तर गाठ माझ्याशी आहे, असा संदेश पोलिस अधीक्षक पाटील यांनी चार पैकी दोन जणांना सेवेतून तत्काळ निलंबित तर दोन जणांना सेवेतून बडतर्फ करुन दिला आहे. 

शिरूर पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी किशोर ज्ञानदेव धवडे यांना गुटखा वाहतूक प्रकरणी नारायणगाव पोलिसांनी ११ एप्रिल २०२० रोजी मांजरवाडी (ता. जुन्नर) येथे अटक केली. त्यांच्याकडून तीस हजार रुपयांचा गुटखा व मोटार जप्त करण्यात आली होती. गुटखा वाहतूक, वितरण, विक्रीस बंदी असताना व कोरोना काळात लॉकडाउन असताना पोलिस कर्मचाऱ्यालाच गुटखा वाहतूक प्रकरणी अटक झाल्याने या घटनेचे तीव्र पडसाद उमटले होते. पोलिस अधीक्षक पाटील यांनी  १२  एप्रिल २०२० रोजी धवडे यांना तडकाफडकी सेवेतून बडतर्फ केले. 

नारायणगाव पोलिस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या अपहरणाच्या गुन्ह्या मदत करण्यासाठी, न्यायालयात लवकर दोषारोपपत्र सादर करण्यासाठी व गुन्ह्यातील दोन आरोपींना अटक न करण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी नारायणगाव पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील, पोलिस नाईक धर्मात्मा कारभारी हांडे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ११ ऑगस्ट २०२० रोजी अटक केली होती. या प्रकरणी पोलिस अधीक्षक पाटील यांनी तडकाफडकी कारवाई करून हांडे यांना सेवेतून बडतर्फ, तर घोडे पाटील यांना सेवेतून काल (ता. १२)निलंबित केले. हांडे व घोडे पाटील यांनी या पूर्वी याच प्रकरणात पाच लाख रुपये घेतले असल्याचे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यामुळे निलंबित झालेले घोडे पाटील यांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश पाटील यांनी दिले आहेत. 

शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या आवारात लावलेल्या वाळूच्या ट्रकवर क्रश सॅन्ड पसरवून वाळू लपवण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून पोलिस नाईक हेमंत पांडुरंग नाईक यांनासुद्धा पाटील यांनी १२ ऑगस्ट रोजी सेवेतून निलंबित केले आहे. खाकी वर्दीशी बेईमानी करणाऱ्या जुन्नर तालुक्यातील दोन व शिरूर तालुक्यातील दोन अशा चार जणांवर पोलीस अधीक्षक पाटील यांनी कठोर कारवाई केल्याने पुणे जिल्ह्यातील पोलिस अधिकारी व कर्मचारी सतर्क झाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com