#PuneFlood न्यायालयीन कामकाजावर पाऊस अन् पुराचा परिणाम

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला पाऊस आणि पूरस्थितीचा न्यायालयीन कामकाजावर देखील परिणाम झाला आहे. सुनावणीसाठी वकील तसेच पक्षकार उपस्थित राहू शकत नसल्याने न्यायालयाने खटल्याचे निकाल तूर्तास देऊ नयेत. पक्षकारांची बाजू ऐकल्यानंतरच निकाल द्यावा, अशी विनंती शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालय तसेच कौटुंबिक न्यायालयातील न्यायाधीशांना वकिलांच्या संघटनेने मंगळवारी केली.

पुणे - गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला पाऊस आणि पूरस्थितीचा न्यायालयीन कामकाजावर देखील परिणाम झाला आहे. सुनावणीसाठी वकील तसेच पक्षकार उपस्थित राहू शकत नसल्याने न्यायालयाने खटल्याचे निकाल तूर्तास देऊ नयेत. पक्षकारांची बाजू ऐकल्यानंतरच निकाल द्यावा, अशी विनंती शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालय तसेच कौटुंबिक न्यायालयातील न्यायाधीशांना वकिलांच्या संघटनेने मंगळवारी केली.

शिवाजीनगर येथील जिल्हा न्यायालयात दररोज हजारो खटल्यांची सुनावणी होते. त्यासाठी शहर आणि जिल्ह्यातून अनेक पक्षकार व वकील न्यायालयात येतात. मात्र सध्या शहर तसेच जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे वाहतूक कोंडी होत असून, काही मार्ग देखील बंद आहेत. त्यामुळे पक्षकारांना सुनावणीसाठी उपस्थित राहणे शक्‍य होत नाही. त्यामुळे न्यायालयाने एखाद्या खटल्यात पक्षकारांचे म्हणणे ऐकल्याशिवाय निर्णय (ॲडव्हर्स रिपोर्ट) देऊ नये, अशी विनंती पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. श्रीकांत अगस्ते तसेच पदाधिकाऱ्यांनी जिल्हा न्यायाधीशांकडे केली.

कौटुंबिक न्यायालयात देखील अनेक दांपत्य व त्यांचे कुटुंबीय सुनावणीसाठी येतात. त्यांच्याबरोबर मुलेही असतात. त्यामुळे कौटुंबिक न्यायालयाने पक्षकारांचे म्हणणे ऐकल्याशिवाय कोणत्याही प्रकारचा निर्णय देऊ नये, अशी विनंती दि फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनच्या अध्यक्ष ॲड. वैशाली चांदणे आणि असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी कौटुंबिक न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश व्ही. व्ही. शहापुरे यांना केली आहे. 

या बाबत संघटनेकडून प्रमुख न्यायाधीशांना निवेदन देण्यात आले आहे. दोन्ही संघटनांच्या मागण्यांचा विचार करू, असे आश्‍वासन न्यायाधीशांनी दिल्याचे संघटनांकडून कळविण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Impact of rain and flood on court functioning