पार्किंग धोरण अमलात आणा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 ऑक्टोबर 2018

पुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने मंजूर केलेल्या पार्किंग धोरणाची (पॉलिसी) अंमलबजावणी तातडीने करावी, अशी मागणी परिसर, पादचारी प्रथम आणि नागरी चेतना मंचने निवेदनाद्वारे महापौर मुक्ता टिळक यांच्याकडे केली आहे. या धोरणाची अंमलबजावणी केली नाही, तर केंद्र आणि राज्य सरकारकडे दाद मागण्यात येईल, असेही या स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी म्हटले आहे.

पार्किंग धोरण मंजूर झाल्यावर पहिल्या टप्प्यात शहरातील पाच रस्त्यांवर त्याची अंमलबजावणी करण्याची घोषणा महापौरांनी केली होती. त्यासाठी समितीही नियुक्त केली; परंतु ते पाच रस्ते कोणते आहेत, हे अद्याप निश्‍चित झालेले नाहीत. शहरातील सायकल ट्रॅक व बस थांब्यांवरही बेशिस्तपणे पार्किंग होत असल्याने वाहतूक कोंडी वाढत आहे. परिणामी पादचारी आणि सायकलस्वारांना त्रास होत आहे. 

राष्ट्रीय शहरी वाहतूक धोरणात पार्किंग पॉलिसीचा अंतर्भाव आहे. त्यातही रस्त्यावर वाहने उभी करणाऱ्यांकडून शुल्क वसूल करणे गरजेचे आहे, असे म्हटले आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात जंगली महाराज किंवा फर्ग्युसन रस्त्यावर पार्किंग धोरणाची अंमलबजावणी करता येऊ शकेल, असे ‘पादचारी प्रथम’चे प्रशांत इनामदार यांनी म्हटले आहे. 

शहरातील अनेक वर्दळीच्या रस्त्यांवर दिवसभर वाहने उभी असतात. त्यामुळे रस्तेही उपलब्ध नाहीत; परंतु त्यासाठी शुल्क आकारणे सुरू केले, तर नागरिक नक्कीच सार्वजनिक वाहतुकीकडे वळतील. त्यामुळे पार्किंग पॉलिसीची अंमलबजावणी सुरू करावी, असे मत ‘परिसर’चे सुजित पटवर्धन यांनी व्यक्त केले. मेट्रो प्रकल्प मंजूर करताच पार्किंग पॉलिसीची अंमलबजावणी करू, असे आश्‍वासन महापालिकेने केंद्र सरकारला दिले आहे. त्यानुसार या पॉलिसीची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे, असे नागरिक चेतना मंचचे निवृत्त मेजर जनरल सुधीर जटार यांनी म्हटले आहे.  

Web Title: Implement parking policy