सातवा वेतन आयोग लागू करा; महापालिकेच्या कामगारांची मागणी

pmc-employee
pmc-employee

पुणे - पुणे महापालिकेच्या ‘ग्रेड पे’नुसारच सातवा वेतन आयोग लागू करा, या मागणीसाठी पुणे महापालिका कामगार युनियनने महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर गुरुवारी आंदोलन केले. या वेळी स्थायी समितीचे अध्यक्ष सुनील कांबळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून कामगारांना त्यांचा न्याय्य हक्क मिळवून देऊ, असे आश्‍वासन दिले.

केंद्र व राज्य सरकारने त्यांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केला आहे. त्यानुसार राज्य सरकारने नगरपालिका व महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनाही तो लागू करावा, असा अध्यादेश जारी केला आहे. मात्र, पालिकेच्या कर्मचाऱ्यांचा ‘ग्रेड पे’ सरकारपेक्षा जास्त असल्याचे कारण सांगून तो कमी करण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे. परिणामी, कर्मचाऱ्यांचे बढतीने वेतन वाढण्याऐवजी कमी होत आहे. युनियनच्या शिष्टमंडळाने स्थायी समिती अध्यक्ष सुनील कांबळे व शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार यांची भेट घेऊन चर्चा केली.

कांबळे म्हणाले, ‘‘पुणे महापालिका कामगार व अधिकारी यांचा सातवा वेतन आयोग हा सहाव्या वेतन आयोगातील ‘ग्रेड पे’नुसारच करावा, असा ठराव सर्वपक्षीय नेत्यांनी व स्थायी समितीने केला आहे. त्यानुषंगानेच वेतन आयोग दिला जाईल. युनियनचे अध्यक्ष उदय भट म्हणाले, ‘‘पालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोग हा सहाव्या वेतन आयोगातील ‘ग्रेड पे’नुसारच घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. 

तसेच, स्थायी समितीने कामगारांच्या बाजूने ठराव मंजूर करून सर्वपक्षीय नेते व पदाधिकारी यांनी आपल्या मागण्यांसंदर्भात सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यामुळे हे आंदोलन आठ सप्टेंबरपर्यंत स्थगित करण्यात येत आहे.’’ या प्रसंगी युनियनशी संलग्न संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. तसेच, चिटणीस मधुकर नरसिंगे, सुमन आष्टूळ, जयश्री भिसे, उपाध्यक्षा शोभा बनसोडे, दिलीप कांबळे व वैजीनाथ गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com