नव्या ब्रेकप्रणालीच्या अंमलबजावणीबाबत संभ्रम 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 एप्रिल 2018

पुणे - सर्वच प्रकारच्या दुचाकी वाहनांना नवी ब्रेकप्रणाली बसविण्याचा आदेश राज्याच्या परिवहन आयुक्त कार्यालयाने दिला असला, तरी या आदेशाच्या अंमलबजावणीबाबत वितरक आणि परिवहन अधिकाऱ्यांमध्येच संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिक ज्या दुचाकी वापरत आहेत, त्यांना ही प्रणाली बसवायची का?, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. 

पुणे - सर्वच प्रकारच्या दुचाकी वाहनांना नवी ब्रेकप्रणाली बसविण्याचा आदेश राज्याच्या परिवहन आयुक्त कार्यालयाने दिला असला, तरी या आदेशाच्या अंमलबजावणीबाबत वितरक आणि परिवहन अधिकाऱ्यांमध्येच संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिक ज्या दुचाकी वापरत आहेत, त्यांना ही प्रणाली बसवायची का?, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. 

परिवहन कार्यालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करायची झाल्यास शहरातील सुमारे 26 लाख दुचाकींपैकी किमान 20 लाख दुचाकी वाहनांना नवी ब्रेक प्रणाली बसविणे सक्तीचे होणार आहे. मात्र, त्याबाबत अजूनही संभ्रम आहे. सुरक्षित वाहतुकीसाठी सर्वच दुचाकींना नवी ब्रेक प्रणाली बसविण्याचा आदेश केंद्र सरकारने राज्य सरकारमार्फत दिला आहे. 125 सीसी व त्यापेक्षा कमी इंजिन क्षमतेच्या नवीन दुचाकी वाहनांच्या मॉडेल्सला 1 एप्रिलपासून ही सक्ती लागू केली आहे. तर, 125 सीसी व त्यापेक्षा कमी इंजिन क्षमतेच्या वापरातील दुचाकींना पुढील वर्षी 1 एप्रिलपासून ऍन्टी लॉक ब्रेकिंग सिस्टिम किंवा कॉम्बिनेशन ब्रेकिंग सिस्टिम बसविणे सक्तीचे केले आहे. तर, 125 सीसीपेक्षा जास्त इंजिन क्षमतेच्या नवीन दुचाकी वाहनांच्या मॉडेल्सना 1 एप्रिलपासून आणि याच क्षमतेच्या वापरातील दुचाकी वाहनांच्या मॉडेल्सना पुढीलवर्षी एक एप्रिलपासून सक्ती केली आहे. 

याबाबत पाषाणकर ऑटोचे सागर पाषाणकर म्हणाले, ""होंडाच्या दुचाकी वाहनांमध्ये ही ब्रेक प्रणाली आहे. त्यामुळे होंडाच्या दुचाकींबाबत याबाबतचा प्रश्‍न राहिलेला नाही.'' तर छत्रपती ऑटोचे रघुवीर अडकील म्हणाले, ""दुचाकी वाहनांच्या नवीन मॉडेल्ससाठी यंदापासून ब्रेकप्रणाली सक्तीची झाली आहे. तसेच वापरातील मॉडेल्सला पुढील वर्षी एक एप्रिलपासून म्हणजे सध्याच्या मॉडेलचे उत्पादन पुढीलवर्षी एक एप्रिलपासून झाल्यावर त्यांना नवी ब्रेक प्रणाली सक्तीची होणार आहे. त्यामुळे सध्या बाजारात असलेल्या दुचाकींना नवी ब्रेक प्रणाली बसवून घ्यावी लागणार नाही.'' मात्र, परिवहन कार्यालयाच्या परिपत्रकानुसार वापरातील वाहनांनाही ही प्रणाली बसवावी लागणार आहे, असे सांगितले जात आहे. मात्र, त्याबाबत कोणतेही तपशील दिलेले नाहीत. त्यामुळे याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे 

नव्या ब्रेक प्रणालीबाबत अनुत्तरीत प्रश्‍न 
- कोण आणि कोठे बसविणार ? 
- किती खर्च येणार ? 
- आरटीओ तपासणी करणार कशी ? 

Web Title: Implementation confusion

टॅग्स