'गुन्हेगारी रोखण्यास शिक्षण संस्थांची भूमिका महत्त्वाची' (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

पौड रस्ता - ‘‘कोणाचेही नियंत्रण नाही असे दिसले तर गुन्हेगारी वाढते. त्यामुळे गुन्हेगारी नियंत्रणासाठी सामाजिक, शैक्षणिक संस्थांचीही जबाबदारी मोठी आहे. तुरुंग ही सुद्धा गुन्हेगार सुधारणारी संस्थाच आहे,’’ असे मत जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी बुधवारी (ता. २८) येथे व्यक्त केले.

पौड रस्ता - ‘‘कोणाचेही नियंत्रण नाही असे दिसले तर गुन्हेगारी वाढते. त्यामुळे गुन्हेगारी नियंत्रणासाठी सामाजिक, शैक्षणिक संस्थांचीही जबाबदारी मोठी आहे. तुरुंग ही सुद्धा गुन्हेगार सुधारणारी संस्थाच आहे,’’ असे मत जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी बुधवारी (ता. २८) येथे व्यक्त केले.

‘मुळशी सत्याग्रह ते मुळशी पॅटर्न’ या विषयावर भारती विद्यापीठाच्या यशवंतराव मोहिते महाविद्यालय एरंडवणे आणि ‘प्रतिबिंब सकाळ संवाद’ यांच्यातर्फे आयोजित परिसंवादात पाटील बोलत होते. मुळशी पॅटर्न टीममधील दिग्दर्शक, लेखक, अभिनेते प्रवीण तरडे, तसेच रमेश परदेशी, मालविका गायकवाड, अमोल धावडे, राजा पायगुडे, विनोद सातव, निर्माते अभिजित भोसले, तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य एस. आर. पाटील, उपप्राचार्य डॉ. सुनील पवार, ए. डी. पाटील, ‘सकाळ’चे वितरण सरव्यवस्थापक सुनील लोंढे, वरिष्ठ उपसंपादक दीपक मुनोत, वितरण व्यवस्थापक संतोष कुडले आदी या वेळी उपस्थित होते.

महाराष्ट्र पोलिसांची गौरवशाली परंपरा कायम ठेवण्याचा निर्धार असल्याचे सांगत पाटील म्हणाले ‘‘एमपीएससी परीक्षेत पास होऊनही पेपर फुटल्याचे निमित्त होऊन निकाल रद्द झाला. त्या वेळी निराश न होता आपल्यातील सकारात्मक ऊर्जेचा वापर करून प्रवीण तरडेंनी चित्रपट क्षेत्रात आपला नावलौकिक वाढवला. त्या प्रमाणे तरुणांनी अपयशाने नाराज न होता यशाचा मार्ग स्वीकारावा, असेही मत पाटील यांनी व्यक्त केले.

विकासातील अपयश खटकले
‘मुळशी पॅटर्न’चा उलगडा करताना प्रवीण तरडे म्हणाले, की विकासात आमचा तालुका कुठे दिसत नाही. हे मनाला खटकत होते. ज्यांच्या जिवावर, जमिनीवर तुम्ही स्वतःचा विकास करता तो सुरक्षारक्षक झाला हे विकासाचे अपयश आहे. त्यातून आलेल्या खदखदीतून गुन्हेगारी निर्माण झाली. मुळशीतून गुन्हेगारही निर्माण झाले आणि राष्ट्रपती विजेते पोलिस अधिकारीही घडले. कोणी कोणता मार्ग निवडला यावर ते अवलंबून आहे.
रमेश परदेशी, मालविका गायकवाड यांनीही मनोगत व्यक्त केले. ‘सकाळ’चे वार्ताहर जितेंद्र मैड, प्रा. अनुराधा जपे यांनी सूत्रसंचालन केले.

‘सकाळ’ने घेतली होती दखल 
प्रवीण तरडे म्हणाले, की मला कोणी नाटकातच घेत नव्हते. परंतु येथील शिक्षकांनी माझ्यावर विश्वास ठेवून संधी दिली. त्यामुळे मी महाविद्यालयाला श्रेय देतो. १९९६ मध्ये मला नाटकात प्रथम पुरस्कार मिळाला. ‘सकाळ’मध्ये याची बातमी आली. त्यामध्ये लिहिले होते, की या मुलांमध्ये उत्तम चित्रपट लिखाण करण्याची ताकद आहे. ती बातमी घेऊन मी गावाला आई-वडिलांना दाखवली. शून्यातून वर येणाऱ्या माणसाला पाठिंबा देण्याचे काम ‘सकाळ’ने नेहमी केले.

Web Title: The important role of education institutions prevent crime says sandeep patil