मुलांवर अपेक्षांचे ओझे लादू नका - इम्रान शेख

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 जानेवारी 2019

पिंपरी - ‘‘पालकांनी स्वत:च्या अपेक्षांचे ओझे मुलांवर लादू नये. त्यांची मित्र-मैत्रिणींबरोबर तुलना करू नये. त्यामुळे मुलांचे मानसिक स्वास्थ्य हरवते, त्यांच्यात न्यूनगंड निर्माण होऊ शकतो. मुलांमधील विशेष प्रावीण्य ओळखून त्याला प्रोत्साहित करावे,’’ असा सल्ला द लर्निंग लेन्स अकादमीचे संचालक इम्रान शेख यांनी पालकांना दिला.

पिंपरी - ‘‘पालकांनी स्वत:च्या अपेक्षांचे ओझे मुलांवर लादू नये. त्यांची मित्र-मैत्रिणींबरोबर तुलना करू नये. त्यामुळे मुलांचे मानसिक स्वास्थ्य हरवते, त्यांच्यात न्यूनगंड निर्माण होऊ शकतो. मुलांमधील विशेष प्रावीण्य ओळखून त्याला प्रोत्साहित करावे,’’ असा सल्ला द लर्निंग लेन्स अकादमीचे संचालक इम्रान शेख यांनी पालकांना दिला.

मासुळकर कॉलनी, पिंपरी येथील नाना आफळे विरंगुळा केंद्रात ‘सकाळ विद्या’ आणि ‘द लर्निंग लेन्स ॲकॅडमी’तर्फे आयोजित ‘दहावी परीक्षेची तयारी आणि करियरच्या संधी’ विषयावर शेख यांच्यासह अकादमीचे प्रशासकीय प्रमुख प्रा. विनीत सुतार यांनी मार्गदर्शन केले. शेख म्हणाले, ‘‘आज उच्च शिक्षणाला ‘स्पेशलायझेशन, स्किल बेस्ड लर्निंग तसेच मल्टी डिसिप्लिनरी ॲप्रोच’ या महत्त्वाच्या घटकांची जोड मिळाली आहे. करिअर निवडताना ‘भविष्यातील आर्थिक उत्पन्नाचे साधन’ हा एकच विचार केला जातो. त्यात गैर काही नाही. परंतु त्याला विद्यार्थ्यांची व्यक्तिगत आवड, तसेच बौद्धिक क्षमतेची जोड मिळाली, तर प्रत्येक व्यक्ती केवळ ‘जॉब ओरिएंटेड’ न होता ‘जॉब सॅटिसफॅक्‍शन’ मिळवू शकेल. प्रत्येक विद्यार्थ्याने एका मुख्य करिअरचा किंवा त्यास पूरक असलेल्या करिअरचा नक्कीच विचार करावा. करिअर निवडताना विविध क्षेत्रांतील मागणीचा विचार पालकांनी करावा. 

प्रा. सुतार म्हणाले, ‘‘घरातील वातावरण दबावाचे नसावे. मुलांना मत मांडण्याचे स्वातंत्र्य असावे. काही वेळेस पालक स्वतःच नवनवीन व्यवसाय क्षेत्रामुळे प्रभावित होतात. त्यामुळे मुलांमध्ये धरसोड वृत्ती निर्माण होईल. विद्यार्थ्यांची क्षमता ओळखणारा शिक्षक असावा, जे तुम्हाला तुमच्या शैक्षणिक क्षमतेबद्दल सांगू शकतील. मुलांना त्यांच्या मनाप्रमाणे करिअर निवडण्यासाठी एकटे सोडू नये. बऱ्याचदा या वयातील विद्यार्थी अपरिपक्व असतो. प्रत्येकाने स्वतःच्या जमेच्या बाजू आणि न जमणाऱ्या बाजू 
जाणून घ्याव्यात. स्वतःच्या मूल्यमापनामुळे योग्य दिशेने वाटचाल शक्‍य होईल.’’ संदीप साकोरे यांनी सूत्रसंचालन केले. 

Web Title: Imran Shaikh Talking to parent Education Child