सुरक्षेची जबाबदारी कोणाची?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 जून 2018

पुणे - जिल्हांतर्गत आणि आंतरजिल्हा बदल्यांमध्ये पुणे जिल्ह्यातील सर्वसामान्य शिक्षिकांबरोबरच स्तनदा आणि गर्भवतींना दुर्गम, अतिदुर्गम आणि पेसा भागातील शाळांमध्ये दिलेल्या नियुक्‍त्या त्वरित रद्द कराव्यात, या शिक्षिकांना ग्रामविकास खात्याच्या नियमानुसार सुगम भागातील आणि दळणवळणाची सुविधा असलेल्या शाळांवर नव्याने नियुक्ती द्यावी, अशी मागणी अन्याय झालेल्या शिक्षिकांनी केली आहे. दुर्गम भागातील नियुक्‍त्यांमुळे या शिक्षिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

पुणे - जिल्हांतर्गत आणि आंतरजिल्हा बदल्यांमध्ये पुणे जिल्ह्यातील सर्वसामान्य शिक्षिकांबरोबरच स्तनदा आणि गर्भवतींना दुर्गम, अतिदुर्गम आणि पेसा भागातील शाळांमध्ये दिलेल्या नियुक्‍त्या त्वरित रद्द कराव्यात, या शिक्षिकांना ग्रामविकास खात्याच्या नियमानुसार सुगम भागातील आणि दळणवळणाची सुविधा असलेल्या शाळांवर नव्याने नियुक्ती द्यावी, अशी मागणी अन्याय झालेल्या शिक्षिकांनी केली आहे. दुर्गम भागातील नियुक्‍त्यांमुळे या शिक्षिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

या संदर्भात संबंधित शिक्षिकांच्या काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया
कोणत्याही शिक्षिकेला दुर्गम भागात नियुक्ती न देण्याबाबतचा ग्रामविकास खात्याचा आदेश आहे. स्तनदा आणि गर्भवतींनाही अशा शाळांवर नियुक्ती न देण्याबाबतही स्वतंत्र आदेश आहे. सध्या माझे बाळ केवळ तीन आठवड्यांचे आहे. तरीही मला अतिदुर्गम भागातील पेसा क्षेत्रातील बांगरवाडी शाळेवर नियुक्ती दिली आहे. नियमानुसार ती त्वरित रद्द करावी. 
- स्वाती क्षीरसागर

पुणे जिल्ह्यातील बदल्यांच्या पहिल्या फेरीत विस्थापित झालेल्या सर्वच शिक्षकांना अवघड व दुर्गम भागातील शाळांवर नियुक्ती दिली आहे. हा सरकारने शिक्षिकांवर केलेला घोर अन्याय आहे. समानीकरणासाठीच्या जागा कोणासाठी रिक्त ठेवल्या आहेत, बोगस माहिती भरून, आम्हाला विस्थापित करणाऱ्यांचे काय, असा प्रश्‍न आहे. बोगस कागदपत्रांची कसून चौकशी व्हावी, त्यात रिक्त झालेल्या जागा विस्थापितांना द्याव्यात. 
- स्मिता शिंदे

खेड तालुक्‍यातील साकुर्डे येथील शाळेवर नवीन नियुक्ती दिली आहे. या गावाला जाण्यासाठी काही अंतर पायी, काही अंतर बसने तर, काही अंतर होडीने प्रवास करावा लागतो. इतक्‍या दुर्गम भागातील ही शाळा आहे. 
- नीलिमा सांडभोर

वालचंदनगर- जंक्‍शन शाळेपासून २०० किलोमीटर अंतरावर असलेली मावळ तालुक्‍यातील अतिदुर्गम महागावमधील शाळेवर नियुक्ती दिलेली आहे. इंदापूर तालुक्‍यात जागा रिक्त असताना आणि पर्याय दिलेल्या २० शाळांपैकी काही शाळांत जागा असतानाही पती- पत्नी एकत्रीकरणाचा लाभ दिला नाही. 
- रेश्‍मा थोरात

मला नियुक्ती दिलेली शाळा दरीखोऱ्यात आहे. माझी मुले पाच वर्षांच्या आतील आहेत. अतिशय निर्मनुष्य असलेल्या रस्त्यांवरून प्रवास करावा लागत आहे. 
- स्वाती वायकर

मला अवघड क्षेत्र, पेसा आणि महिलांसाठी प्रतिकूल, असा शेरा असणारी शाळा मिळाली आहे. शाळेचे घरापासूनचे अंतर १६० किलोमीटर आहे. नदी, नाले, डोंगर आणि दऱ्यांमधून जाणारे रस्ते निर्मनुष्य आहेत. शाळेत विषारी साप सातत्याने दिसतात. दिवसभर घरी लहान मुलांना ठेवून, अशा शाळेवर काम करणे अवघड आहे.
- मनीषा साबळे

मी उपशिक्षिका आहे. मला आंबेगाव तालुक्‍यात दुर्गम भागातील शाळेवर नियुक्ती दिली आहे. या शाळेवर उपशिक्षकाची जागाच रिक्त नाही. तेथे पदवीधर शिक्षकांची जागा असल्याने, मला शाळेवर रुजू होता आलेले नाही. मुळात बदल्यांमध्ये अन्याय आणि त्यात रुजू होण्यात अडसर, या पार्श्‍वभूमीवर आता तरी मला सोप्या क्षेत्रातील शाळेवर नियुक्ती मिळाली पाहिजे. 
- नीलिमा मांडेकर

यंदाच्या बदल्यांमध्ये शिक्षिकांना दुर्गम भागातील शाळांवर नियुक्ती देऊन घोर अन्याय केला आहे. हाच नियम यापुढेही कायम ठेवणार आहात का, असा माझा सवाल आहे. पुढच्या वर्षी नियम बदलणार आणि आमच्यावरच अन्याय होणार. त्यामुळे हा अन्याय आत्ताच दूर झाला पाहिजे.
- सारिका फल्ले

Web Title: Inaccessible school security