दुर्गम शाळा शिक्षिकांच्या माथी

गजेंद्र बडे
मंगळवार, 19 जून 2018

पुणे - राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी शिक्षिकांना दुर्गम भागातील शाळांत (अवघड क्षेत्र) नियुक्ती न देण्याचा आदेश दिला आहे. मात्र, पुणे जिल्ह्यात याच्या उलटे घडले आहे. जिल्ह्यातील दुर्गम आणि पेसा क्षेत्रातील सुमारे पाचशे शाळांमध्ये शिक्षिकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामविकास विभागाचा हा निर्णय जिल्ह्यातील शिक्षिकांसाठी मृगजळ ठरला आहे. 

पुणे - राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी शिक्षिकांना दुर्गम भागातील शाळांत (अवघड क्षेत्र) नियुक्ती न देण्याचा आदेश दिला आहे. मात्र, पुणे जिल्ह्यात याच्या उलटे घडले आहे. जिल्ह्यातील दुर्गम आणि पेसा क्षेत्रातील सुमारे पाचशे शाळांमध्ये शिक्षिकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामविकास विभागाचा हा निर्णय जिल्ह्यातील शिक्षिकांसाठी मृगजळ ठरला आहे. 

जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या जिल्ह्याअंतर्गत बदल्या यंदा थेट राज्यस्तरावरून ऑनलाइन पद्धतीने झाल्या आहेत. या बदल्यांचे काम पुण्यातील एनआयसीकडे (नॅशनल इन्फॉर्माटिक्‍स सेंटर) सोपविले होते. मात्र, या केंद्रातील अधिकाऱ्यांनी लक्ष्मीदर्शनामुळे राज्य सरकार, शिक्षक आणि जिल्हा परिषदेस अंधारात ठेवत बदल्यांमध्ये गोलमाल केल्याचा आरोप जिल्ह्यातील शिक्षकांनी केला. त्यामुळे या बदली प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. 

शिक्षक बदल्यांबाबतचे नवे धोरण सरकारने फेब्रुवारी २०१७ पासून अमलात आणले आहे. या धोरणानुसार जिल्हा परिषदांकडील बदल्यांचे अधिकार काढून घेतले आहेत. त्यामुळे यंदा प्रथमच राज्य सरकारच्या अधिकारात या बदल्या करण्यात आल्या. जिल्ह्यातील स्तनदा आणि गर्भवती शिक्षिकांना अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या पेसा क्षेत्रातील शाळांत नियुक्‍त्या देण्यात आल्या आहेत. 

दरम्यान, ‘एनआयसी’ने केलेल्या बदल्यांमध्ये दुरुस्ती किंवा त्या बदलून देण्याचा अधिकार जिल्हा परिषदेला नाही. परिणामी, जिल्हा परिषदेचे जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी केवळ तक्रारी ऐकून घेण्यापलीकडे काही करू शकत नाहीत. 

बदल्यांमध्ये महिलांवर अन्याय होऊ नये, त्यांना गैरसोयीच्या शाळांवर नियुक्ती मिळू नये, यासाठी ग्रामविकास विभागाने दोन स्वतंत्र अध्यादेश काढले आहेत. यापैकी पहिला अध्यादेश हा स्तनदा आणि गर्भवतींसाठीचा असून, त्यांना दुर्गम किंवा पेसा क्षेत्रातील शाळा न देण्याबाबत स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे. दुसऱ्या अध्यादेशात कोणत्याही शिक्षिकेला दुर्गम भागातील शाळेवर नियुक्ती न देण्याबाबतचा आहे.

शिक्षकांच्या बदल्या दृष्टिक्षेपात
 जिल्ह्यातील शिक्षकांची संख्या -    ११ हजार ५००
 शिक्षिकांची संख्या -    पाच हजार ४७४  
 बदली झालेल्यांची संख्या -    सहा हजार ४३ 
 जिल्ह्यातील शाळांची संख्या -    तीन हजार ७१७ 
 सुगम भागातील एकूण शाळा -    दोन हजार ७८३ 
 दुर्गम भागातील शाळा -    ९३४ 
 दुर्गम शाळांत नियुक्ती मिळालेल्या शिक्षिका -    सुमारे ४००

Web Title: Inaccessible school teacher